नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या तापमानात (temperature) ६.६ अंशांनी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसातही उष्णतेचा परिणाम जाणवू लागला आहे. जनजीवनावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. नाशिकचे कमाल तापमान १९ तर किमान तापमान ३०अंशापर्यंत पोहोचले आहे.
सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. तर या काळामध्ये म्हणजेच डिसेंबरमध्ये थंडीचा जोर असतो. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जोरदार थंडी पडेल, असा अंदाज बांधला जात होता. हवामान तज्ञदेखील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करत होते. परंतु उत्तर भारताकडून वाहणारे थंड वारे हे तापमानातील बदलामुळे संथ गतीने वाहत आहेत, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम तापमानामध्ये वाढ होण्यामध्ये दिसून येत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी नाशिकच्या तापमानामध्ये वाढ झाली होती. त्यानंतर मागील आठवड्यात तापमान पुन्हा खाली उतरले होते आणि थंडी जाणवू लागली होती. परंतु या आठवड्याची सुरुवात होताच नाशिक जिल्ह्यातील तापमानात मागील २४ तासात ६.६ अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे.
नाशिक शहराचे कमाल तापमान १९.३ तर कमाल तापमान ३०.३ हे मागील २४ तासात नोंदविण्यात आले. या महिन्यातील सर्वात जास्त तापमान हे मागील शनिवारी नोंदविण्यात आले आहे. शनिवारी १५.४ किमान तर कमाल ३०.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर ही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अचानक थंडीच्या दिवसांमध्येदेखील उष्णतेचे वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसून येत आहे.