Saturday, July 5, 2025

Ratnagiri : कसे वाढणार क्रीडा नैपुण्य?; जि.प.च्या ४५० शाळांना मैदानच नाही!

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri) २४९४ शाळा असून त्यापैकी ४५० शाळांना मैदानेच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. येथील विद्यार्थ्यांना त्यामुळे क्रीडा विषयक नैपुण्य मिळवणे कठीण जात आहे.


शाळा देते मैदान ही संकल्पना राज्य सरकारकडून सुरु करण्यात आली. सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमांतून शाळांना मैदाने तसेच कंपाऊंडवॉल दुरुस्ती, प्रयोगशाळा, शिक्षक आदींवर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. केंद्राने मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व शिक्षण अभियानातून कोट्यवधी रुपये दिले तरीही रत्नागिरी जिल्ह्यात ४५० शाळांमध्ये मैदानेच नसल्याने या मुलांची मोठी गैरसोय होत आहे.


सर्वाधिक राजापूर तालुक्यात १०३ शाळांना मैदानेच नाहीत तर लांजा तालुक्यात ४६, संगमेश्वरमध्ये १४, गुहागरमध्ये २६, चिपळुणमध्ये २८, खेडमध्ये २७, दापोलीत ९८ तर मंडगणड तालुक्यात ४१ शाळांना मैदाने नाहीत. रत्नागिरी तालुक्यात ५७ शाळांना मैदाने नसल्याने या शाळांतील मुलांचा क्रीडाचा तास वाया जातत आहे. मुलांना शारीरिक शिक्षण आणि चांगले मैदान असणे गरजेचे आहे. क्रीडा विभागामार्फत मुलांना व्यायाम शाळांसाठी पैसे दिले जातात. तसेच क्रीडा विषयक उपकरणासाठीही पैसे प्राप्त होतात.


परंतु रत्नागिरी जिल्ह्यात ४५० शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे तर काही शाळांनी आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवायला सुरुवात केली आहेत. तसेच ज्या शाळांमध्ये मैदाने नाहीत अशा शाळांसाठी मैदाने करणे गरजेचे आहे.


जिल्ह्यातील मुलांमध्ये चुणूक असूनही मैदानांअभावी त्यांना आपल्या क्रीडा नैपुण्यात वाढ करता येत नाही. रोजचा सराव नसल्याने अशी मुले अनेक खेळातून पाठी पडत आहेत. आज जगभरात अनेक देश क्रीडा नैपुण्यामुळे ओळखले जातात. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धातून चमकतात. भारत देशात विविध खेळ प्रकारातून मुले पुढे येताना दिसत नाहीत. ग्रामीण भागातील मुलांना हवे तसे प्रोत्साहन प्रशासनाकडून मिळत नाही.

Comments
Add Comment