Sunday, June 22, 2025

महापुरुषांबाबत अपमानाची स्वप्नातही कल्पना करु शकत नाही

महापुरुषांबाबत अपमानाची स्वप्नातही कल्पना करु शकत नाही

राज्यपाल कोश्यारींचे अमित शहांना पत्र


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांनी राज्यपाल पदावरुन पायउतार व्हावे अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्यात होणाऱ्या या विरोधानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. यात राज्यपाल म्हणताय की, महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही. माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले असे पत्रात म्हटले आहे. मुघल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लिहीले आहे.


भगतसिंह कोश्यारी पत्रात पुढे म्हणतात की, मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत होते. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो.


कोश्यारी म्हणाले की, आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही. आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

Comments
Add Comment