दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर काही स्टार खेळाडू निवृत्ती स्विकारू शकतात. त्यात रोनाल्डो, नेमार, रॉबर्ट लेवांडोस्की यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपल्या वयाची तिशी ओलांडली आहे. त्यामुळे फुटबॉलमधील हे दिग्गज आता अलविदा करण्याची दाट शक्यता आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने शिल्लक आहेत. उपांत्य फेरीचे सामने १४ आणि १५ डिसेंबरला होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केलेले काही स्टार खेळाडू निवृत्ती स्विकारू शकतात. यात पहिला नंबर लागतो तो ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार याचा. नेमारने निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. परंतु तो अद्याप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही. यात हेडर किंग क्रिस्टियानो रोनाल्डो, रॉबर्ट लेवांडोस्की यांच्यासह काही महान खेळाडू आहेत. त्यांचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
नेमारच्या ब्राझील संघाला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोशियाकडून शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. या विश्वचषकात नेमारने ब्राझीलसाठी २ गोल केले आहेत. सुआरेझ, मॉड्रिक, लुकाकू, बस्केट्स, मुलर, नेउर, जोर्डी अल्बा, सर्जिओ रामोस, बेंझेमा, पॉल पोग्बा, इडेन हॅझार्ड आणि केविन डी ब्रुएन अशी काही डझन नावे आहेत, ज्यांच्यासाठी हा फिफाचा अंतिम विश्वचषक असू शकतो. या साऱ्या दिग्गज खेळाडूंनी आता तिशी ओलांडली आहे.
आता सर्वांच्या नजरा अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेसी आणि गतविजेता फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्या संघावर आहेत. हे दोन्ही खेळाडूंनी दशकाहून अधिक काळ वर्चस्व गाजवले. त्याने चमकदार कामगिरी करून अनेक विक्रम तर केले आहेतच, पण आपल्या संघासाठी मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपदही मिळवले आहेत.