Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीChitra Wagh : 'निर्भया 'ची १७ वाहने आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात!

Chitra Wagh : ‘निर्भया ‘ची १७ वाहने आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात!

चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारने दिलेल्या निर्भया निधीतून महिलांसाठी वापरात यावयाचा गाड्यांपैकी १७ गाड्या तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात ठेवण्यात आल्याचा गोप्यस्फोट भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निर्भया निधीतील गाड्यांचा शिंदे-फडणवीस सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपाचे खंडन करताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या सरकारकडूनच महिलांसाठी देण्यात आलेल्या गाड्यांचा गैरवापर केला गेल्याचे सांगितले. याच निधीतील एक गाडी तर दस्तूरखुद्द सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षाताफ्यातच होती असे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्भया निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या गाड्या वापरताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही, असा सवाल करत त्यांनी सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र तत्काळ थांबवण्यास सांगितले.

निर्भया निधीतून ४ फेब्रुवारी २०२२ रोजी २२० गाड्या खरेदी करण्यात आल्या. यातील १२१ वाहने मुंबईतल्या ९४ पोलीसठाण्याला देण्यात आली. उरलेल्या ९९ गाड्या फक्त महिलांविषयक कामाशी संबंध नसलेल्या पोलीस खात्याच्या इतर विभागांना देण्यात आल्या. यात जलदगती कृती दल, संरक्षण विभाग, सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हेविषयक विभाग, श्वान पथक, लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय, मोटर परिवहन अशा विविध विभागांचा यात समावेश आहे. या सर्व विभागांमध्ये तसेच इतरत्र वापरण्यात येत असलेली वाहने पुन्हा एकत्र आणून ती महिलांसाठीच वापरण्याचे काम आमचे सरकार करेल. साधारण आठवड्याभरात ही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली.

निर्भया निधीतून निर्भया पथकांसाठी वापरात यावयाच्या इतर विभागांना देण्यात आलेल्या ९९ वाहनांपैकी १२ वाहने तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री छगन भुजबळ, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि अदिती तटकरे या मंत्र्यांच्या सुरक्षाताफ्यात होत्या. एक वाहन खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षाताफ्यात होते. तब्बल १७ वाहने तेव्हाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात वापरात होत्या, असेही त्यांनी सांगितले. निर्लज्जपणे निर्भया वाहनांचा गैरवापर करायचा आणि शिंदे-फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, असे कृत्य आम्हाला सुप्रियाताईंकडून तरी अपेक्षित नाही, असेही त्या म्हणाल्या

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -