भगवंतावरचं प्रेम म्हणजे काय? देवावरची श्रद्धा म्हणजे काय? ती कुठे सापडते? कशी शोधावी? पूजा अर्चनेत मिळते? जपजाप्य करून साधते? देवासमोर बसून ध्यानाने सापडते? उपास-तापास करून प्राप्त होते?
यापैकी कशातच ती सापडत नाही. मीराबाई विषाचा प्याला अमृत म्हणून प्यायली त्यात तिची भक्ती दिसते. चिखल तुडवताना पायाखाली लेकरू आलेले गोऱ्हा कुंभाराला पांडुरंगाचे नाव घेताना कळलं नाही. त्यात भक्ती नजरेला पडते. द्रौपदीला वस्त्रे पुरवताना तिच्या आर्ततेत त्या वासुदेवाची लपलेली भक्ती दिसते.
राधा ही प्रेमाची धारा आहे. तिच्या विचारातही मला भक्ती सापडली. छोट्या कन्हैयाला आलेला ताप काही कमी होत नव्हता. कोणत्या उपायाने तो उतरेल म्हणून यशोदा बैचेन होती. तिला कळाले की, गोपिकांच्या पायाची धूळ जर कान्हाच्या कपाळी लावली तर ताप उतरेल. ती बिचारी प्रत्येक गोपिकेच्या दारी जाऊन धुळीची भीक मागत होती. पण गोपी म्हणत होत्या, आमच्या पायाची धूळ आणि कान्हाला? आम्ही नरकात जाऊ. नको रे बाबा! शेवटी निराश झालेली यशोदा राधेकडे गेली. तिला आपली अडचण सांगताक्षणी राधा म्हणाली, ‘इतकंच ना? मी माझ्या पायाची धूळ देते. कान्हाला बरं वाटण्यासाठी मी नरकात गेले तरी काहीच बिघडत नाही.’
याला म्हणतात भक्ती आणि या भक्तीचा अनुभव २१व्या शतकात प्रतिवर्षी वारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित वारकऱ्याला आला. त्याचं नाव सुधीर महाबळ. ते परतवारी करत असताना (पंढरपूर ते आळंदी) शेवटच्या टप्प्यावर आले. पुणे-आळंदी येताना पालखी विठोबापाशी पोहोचली. प्रत्येक ठिकाणी दर्शनाला जाताना बूट, मोजे काढायचे, पावसाची चिकचिक याला महाबळ कंटाळले. टंगळमंगळ करत तिथेच थांबले. त्यांना हाक ऐकू आली. अव माऊली, मी आळंदीची माऊली, दर्शन घेतलं का? ही पानं फुलं घ्या. थोडा येळ घ्या दरसन म्हटलं ना? तिच्या बोलण्यात एक दरडावलेपण होतं. बूट तिथं ठिवा. मी इथं हाय काळजी नको.
एक अक्षरही न बोलता आज्ञाधारी मुलासारखे ते गेले. चिमटीत बूट धरून जरा कोरड्या जागी ठेवले. दर्शन करून आले. माळीण माऊलीमुळे दर्शन झालं. चेहऱ्यावर समाधान येऊन हसले.
‘आलो गं माऊली’ म्हणून बुटाजवळच्या दगडावर बसले. इकडे तिकडे पाहिले. पाय मातीने भरले होते. आता मोजे घालण्यापूर्वी ते पुसले तरी पाहिजेत म्हणून काही पेपर वगैरे शोधत होते. पण काही मिळेना. त्या माऊलीचा आवाज आला. माऊली बसलाय तिथं हात मागं करा जरा. त्यांनी हात मागे केला. हाती घेऊन बघितलं तर लुगडं होतं.
‘माऊली हे लुगडं आहे. याला का चिखलाचे पाय पुसायचे?’
‘माझंच लुगडं हाय. खुशाल पूस. त्या लुगड्याला माती तरी लागल. जे पाय पंढरीला जाऊन आले तिथली पवित्र माती लुगड्याला लागल. केवढं पुण्य हाय माझं. मला जाणं होईना, ते लुगडं माझ्यापाशी राहील,’ असं म्हणून हात जोडले आणि पाना-फुलांचे पैसे पण न घेता पायाला हात लावला.
आता मला सांगा, राधेने यशोदेला पायीची दिलेली धूळ आणि माळीणीच्या लुगड्याला लागलेली पंढरीची माती, चिखल यात फरक काय?
आजही अशी माणसं आहेत, पण पाहायला आमचे डोळे उघडे नाहीत. आम्हाला कुठं थांबायला वेळ नाही. विचारांना खोली नाही. माझं माझ्यासाठी यात भक्ती नसते. जे जपतो ते वर पण नेता येत नाही. क्या करेगा जमा करके हिरा मोती, कफनको ए यार, जेब भी नही होती! आमच्या भक्तीला रुंदी असते, पण राधेच्या, माळीणीच्या भक्तीला खोली आहे, हे आम्हाला कधी कळणार?
-माधवी घारपुरे