राम-कृष्ण-हरी हा मंत्र अव्याहत जपायचा आणि जगातील सगळा कोलाहल, कटकटी विसरून जायच्या. (Swami Swaroopananda) अत्यंत नीरव शांतता अनुभवायची असेल आणि निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला विसरून जायचे असेल, तर रत्नागिरीजवळ असलेल्या पुण्यभूमी पावसला भेट देणे अनिवार्य ठरते.
स्वामी स्वरूपानंदांच्या (Swami Swaroopananda) वास्तव्याने पुनित झालेला हा परिसर आहेच तसा निसर्गरम्य आणि पवित्र. रत्नागिरीपासून फक्त २० कि.मी. वर असलेल्या पावस या गावी स्वामी स्वरूपानंदांची संजीवन समाधी आहे.
स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी १५ डिसेंबर १९०३ रोजी झाला. त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. ते पुढील शिक्षणाकरिता मुंबईला ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. त्यांचे वाङ्मयविशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या ‘टिळक महाविद्यालया’त झाले. त्यांच्यावर घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरू होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारून गेली होती. तशात त्यांनी देखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यांनी शाळा सोडली.
स्वामी स्वरूपानंद यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले. त्यांनी राष्ट्रोद्धारासाठी तरुणांना स्वावलंबनपूर्वक राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखली. स्वरूपानंद यांनी ‘स्वावलंबनाश्रम’ नावाची शाळा १९२३ साली स्थापन केली आणि त्यातून तरुणांना बहुविध व अभिनव शिक्षण देण्यास सुरुवात केली. विद्यार्थी स्वावलंबनाश्रमाकडून शैक्षणिक प्रगतीबरोबर अष्टपैलू व्हावा यासाठी तळमळीने प्रयत्न केले जात होते. विद्यार्थ्यांना सूतकताई, हातमागावर खादी विणणे या व्यावसायिक कौशल्याबरोबर मल्लखांब, लाठी चालवणे, व्यायाम, खेळ, लेझीम यांचे शिक्षण दिले जात होते. तसेच, स्वरूपानंदांनी गावातील सार्वजनिक उत्सवातील हीन अभिरुची कमी व्हावी (जसे – नाट्य, गाणी, नाच, तमाशा) यासाठी राष्ट्रीय मेळे, प्रवचने यांसारखे कार्यक्रम सुरू केले. त्यात तरुणांना सहभागी करून घेतले. स्वावलंबनाश्रमाचे कार्य १९२७ पर्यंत सुरू होते, पण त्यानंतर इंग्रजांनी सर्व राष्ट्रीय शाळांवर बंदी आणली. सर्व शाळा एक-एक करत बंद होऊ लागल्या. स्वावलंबनाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही सरकारी रोषाच्या भीतीने घटत गेली. विद्यार्थी नाममात्र उरले. त्यामुळे स्वरूपानंद स्वावलंबनाश्रम बंद करून उर्वरित विद्यार्थ्यांसह उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले. तेथे त्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घेऊन वाङ्मयविशारद पदवी मिळवली. त्यांनी स्वत: कष्ट करत, अर्थार्जन करून विद्यार्थ्यांना शिकवले. त्यांनी कुशाग्रबुद्धी, सूक्ष्म अवलोकन, अवांतर वाचन, परहिताची कळकळ यांच्या जोरावर राजकारण, समाजकारण व शिक्षण या क्षेत्रांत काम करूनदेखील ते मनाने त्यापासून अलिप्त राहिले.
स्वरूपानंद यांनी १९३२च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत सहभाग घेतला, अनेक सत्याग्रही कोकणात दौरे काढून मिळवले. त्यामुळे त्यांना अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली. येरवड्यात स्वरूपानंद यांना आचार्य जावडेकर, एस. एम. जोशी, शंकरराव देव अशा विभूतींचा परिचय झाला. त्यांना त्यांचा सहवास लाभला. त्यांनी येरवड्यात मिळालेल्या एकांतवासाचा उपयोग ध्यानाच्या अभ्यासासाठी केला. तेथेच त्यांनी सद्गुरू स्तवनपर ‘नवरत्नहार’ या नऊ ओव्यांच्या काव्याची रचना केली. त्यांनी ते तुरुंगातून सुटल्यावर तो ‘नवरत्नहार’ त्यांच्या गुरुचरणी अर्पण केला. दरम्यानच्या काळात त्यांच्यात तीव्र मुमुक्षुत्व उत्पन्न झाले आणि त्यांना सद्गुरूकृपेची तळमळ जाणवू लागली. अशा वेळी, त्यांचे मामा केशवराव गोखले हे रामचंद्र यांना सद्गुरू गणेश नारायण ऊर्फ सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना बाबा महाराजांचा अनुग्रह १९२३ साली प्राप्त झाला आणि त्यांची वृत्ती निजानंदात रंगू लागली. त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले. स्वरूपानंदांचे गुरू बाबामहाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील नाथ सांप्रदायिक आत्मसाक्षात्कारी पुरुष होते. त्यांच्या अनुग्रहामुळे स्वरूपानंदांची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली. स्वरूपानंदांना गुरुकृपा लाभली व त्यासोबत त्यांचा संत साहित्याचा अभ्यास असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती वेगाने झाली. त्यांचे गुरू ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखित प्रतीचे वाचन नित्य करत. ती प्रत जीर्ण झाली होती. स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून ती प्रत गुरूंना अर्पण केली. त्यांना त्यांची आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाची सोऽहं साधना सुरू असतानाच मलेरिया झाला. त्या आजाराने त्यांचा पिच्छा चार महिने पुरवला, अंगात उठायचे त्राण उरले नव्हते. त्यांना मृत्यू त्यांच्या अगदी समीप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या ठायी परमात्म्याबद्दल दृढतम भक्तिभाव निर्माण झाला. त्यांच्या भक्तिबळाने त्या चार महिन्यांच्या काळात काम-क्रोधादी भावना दग्ध झाल्या होत्या, त्यांना जीवदशा नष्ट होऊन आत्मप्रचिती प्राप्त झाली होती. त्यांनी अहंकाररूपी संसार-शत्रूला मृत्युपंथाला लावले होते. जणू त्यांचा पुनर्जन्म झाला होता! त्या काळातील त्यांचे अनुभव त्यांनी स्फूट काव्याच्या रूपात ‘अमृतधारा’ या काव्यसंग्रहात साकीबद्ध रचनेत मांडले आहेत. त्यांचे कामातील सहकारी डॉ. बाबा देसाई यांनी त्यांच्या आजारपणात त्यांची सेवाशुश्रूषा केली. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली. त्यांची वृत्ती आत्मसुखात रंगू लागली, साधनेस पूर्णत्व आले.
“मनुष्यमात्राने त्याच्या मूळच्या सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव ठेवून सोsहंभावाने सर्व प्राप्त कर्तव्ये उत्साहाने, अनासक्त वृत्तीने व ईश्वरपूजन या भावनेने करावीत” हा स्वरूपानंदांचा उपदेश आहे. त्यांनी सोऽहं साधनेचा पुरस्कार केला. स्वामी स्वरूपानंदांची भेट पुढील काळात अनेक संतमहंतांनी व महत्त्वाच्या व्यक्तींनी घेतली. त्यामध्ये श्रीमत् परमहंस श्रीधरस्वामी (सज्जनगड), श्रीभालचंद्र महाराज (कणकवली), ग. वि. तुळपुळे (सांगली), म. म. दत्तो वामन पोतदार (पुणे), पांडुरंगशास्त्री गोस्वामी, टेंबे महाराज (राजापूर), जेरेशास्त्री (कोल्हापूर), शिवशाहीर ब. मो. पुरंदरे, पंडित भीमसेन जोशी, काणे महाराज (बेळगाव), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, राष्ट्रीय पंडित खुपेरकर शास्त्री, दयानंद बांदोडकर (गोवा), शशिकला काकोडकर, ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉ. गिंडे, तसेच लाँगमनग्रीन आणि पेंग्वीन या इंग्लंडमधील नामांकित प्रकाशन संस्थेचे प्रमुख सर रॉबर्ट ऍलन व त्यांची पत्नी यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.
१९३३च्या आजारपणानंतर पावसमधील देसाई यांनी स्वामीजींना स्वतःच्या घरी येऊन राहा म्हणून विनंती केली, त्यानंतर स्वामीजी १९७४ पर्यंत देसाई यांच्या अनंत निवास या वास्तूमध्ये राहत होते. या मधल्या काळात एक दोनदा ते रत्नागिरीला गेले असतील तेवढेच. या जवळजवळ ४० वर्षांच्या काळात एक अतिशय साधे, ईश्वरशरण व सिद्धावस्थेतील जीवन कसे असते याचा जणू धडाच स्वामीजींनी घालून दिला. अनेक भाविकांना त्यांनी सोऽहंची दीक्षा देऊन अनुग्रहित केले. आपले संबंध आयुष्य त्यांनी तेथील ज्या एका खोलीत काढले व सतत सोऽहं नाद आळवला त्या पवित्र खोलीत त्यांचे चैतन्यमय दर्शन घेण्यासाठी अजूनही अनेक भाविक येत असतात. याच वास्तूत त्यांनी अभंग ज्ञानेश्वरीसारख्या अनेक पारमार्थिक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचा परमार्थातील अधिकार ध्यानात घेऊन परिव्राजकाचार्य श्री श्री धरस्वामी महाराज, गोळवलकर गुरुजी तसेच परमार्थातील अनेक अधिकारी व्यक्ती स्वामीजींना भेटून गेल्या होत्या. आपल्या वाट्याची विहित कर्मे करीत असतानाच जर योग्य प्रकारे परमार्थाची साधना कोणी करेल, तर तो याच जन्मात शाश्वत सुख नक्कीच भोगू शकेल हे त्यांचे सांगणे होते. अर्थातच स्वामीजींसारख्या अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन याकरता अतिशय जरुरीचे आहे. खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थितीत सुखाने भोगण्याची कला शिकवीत असतो, हे त्यांच्या चरित्रग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले त्यांचेच एक वचन सर्व काही सांगून जाते. “राम कृष्ण हरी” हा गुरुमंत्र त्यांनी आपल्या शिष्यांना दिला. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामींनी पावस इथे संजीवन समाधी घेतली.
देशभरातील हजारो भक्तगण त्यांच्या समाधी सोहळ्याला हजर होते. या स्मृतिमंदिराच्या तळाशी असलेल्या ध्यानगुंफेत त्यांचा नश्वर देह ठेवला आहे. गुरुपौर्णिमा आणि स्वामींचा निर्वाण दिन इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अत्यंत स्वच्छ आणि टापटीप असणारे हे स्मृतिमंदिर आहे. स्वामींचे राहते घरच मंदिर म्हणून उत्तम पद्धतीने राखले गेले आहे. पावस या गावात गणेश मंदिर, तसेच नदीच्या पलीकडे विश्वेश्वर आणि सोमेश्वर ही शिवमंदिरे आहेत. पावस गावात असणारी अनंत-निवास ही वास्तू, स्वामी स्वरूपानंदांचे सुमारे चाळीस वर्षे वास्तव्य असलेली जागा आहे. इथेच असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद आश्रमात आलेल्या भाविकांना, प्रवाशांना, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था होते. सकाळी खिचडीचा प्रसाद विनामूल्य दिला जातो. भाविकांना जे काही देण्याची इच्छा असते, त्यासाठी दानकुंभ आणि देणगी घेऊन पावती देण्याचीही व्यवस्था केलेली आहे. पावसमध्ये माऊली माहेर इथे निवास आणि भोजन व्यवस्था अगदी उत्तम आहे.
-सतीश पाटणकर