
नागपूर : महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू पाहणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Samriddhi Highway) रविवारी ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे.
या सोहळ्याचा तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्सला भेट दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एम्स येथे एकाच वेळी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन करणार आहेत. या ठिकाणच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामान्य नागरिक ही उपस्थित राहणार असून या ठिकाणच्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान ते वंदे मातरम एक्सप्रेसचा शुभारंभ, मेट्रोचा शुभारंभ, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, चंद्रपूर येथील सिपेट कॉलेजच्या इमारतीचा शुभारंभ, एम्समधील विद्यार्थ्यांची भेट, अनेक उपक्रमांचा शुभारंभ असे कार्यक्रमांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्यादरम्यान सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना फडणवीस यांनी केली. रेल्वे स्थानक, मेट्रो या परिसरातील नियमित जनजीवन सुरळीत राहून हा दौरा होईल यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बैठक व्यवस्था व अन्य सुरक्षा व्यवस्थेचा पोलिसांकडून आढावा घेतला.