कॉलेजमध्ये कधीतरी ड्रॉइंग आणि पेंटिंग्स करत होते. फार चांगली कलाकार नव्हते; (Poetess) परंतु आवड म्हणून करत होते. ते ड्रॉइंग्स आणि पेंटिंग्स आमचे सांस्कृतिक प्रमुख कॉलेजच्या बोर्डावर कौतुकाने लावत होते. मी कॉलेजचा अभ्यास सोडून कधीतरी एवढेच काय ते करत होते.
मला अजूनही आठवतंय स्वामी विवेकानंद, चेंबूर येथे मी सेकंड ईयर बीएस्सीला होते, तेव्हा आम्हाला ‘केमिस्ट्री’ हा विषय शिकवणाऱ्या आणि सांस्कृतिक प्रमुख असलेल्या इसराणी सरांनी जे मला कॉलेजच्या मासिकासाठी एक कविता लिहिण्यास सांगितले. खरं तर आमच्या वर्गात बोटावर मोजण्याइतकेच मराठी भाषिक विद्यार्थी होते. त्यामुळे असेल कदाचित किंवा ड्रॉइंग-पेंटिंग्सच्या निमित्ताने सरांची माझी थोडीशी ओळख होती. म्हणून कदाचित पण त्यांनी मला कॉलेजच्या मासिकासाठी एक ‘कविता’ लिहिण्यास सांगितले. मी त्यांना चक्क नकार दिला. पण तो नकार बहुधा त्यांनी ऐकला नसावा. मग केमिस्ट्रीच्या तासानंतर जो गणिताचा तास सुरू झाला त्या तासाला मी चक्क गणिताच्या वहीत काहीतरी खरडलं आणि विसरूनही गेले.
दुसऱ्या दिवशी सरांनी येऊन विचारलं की, “मी काही लिहिलं का?” तर मी त्यांना सांगितलं की “सर नाही जमलं.” इतक्यात माझी मैत्रीण सुषमा हिने माझ्या बॅगेतील वही उघडून सरांना ‘ती’ कविता दाखवली. त्या कवितेचे नाव ‘जीवन.’ आमचे सर सिंधी भाषिक होते. त्यांना कितपत ती कविता कळली माहीत नाही. पण त्यांनी तो कागद फाडून घेतला. मी सरांच्या मागे मागे पळत गेले आणि सांगितलं की, “सर प्लीज नका ना घेऊ ती कविता.” तर सर म्हणाले की, “ते ती घेणारच!” कारण त्यांना त्या मासिकासाठी मराठी हिंदी-गुजराती-सिंधी-इंग्लिश सर्व भाषांमधील साहित्य हवे होते. त्यांनी मला नकाराचे कारण विचारले, तर माझ्या मनात त्या काळात काही गैरसमज होते ते मी त्यांना सांगितले. जसे की, “कवींपासून सर्वसामान्य माणसं दूर पळतात… कवी आपल्या कवितांची पोतडी घेऊन जो मिळेल त्याला कविता ऐकवण्याच्या मागे असतो आणि ती माणसं त्याच्यापासून दूर पळण्याच्या… याशिवाय कवींची लग्न होत नाहीत.” असो! सर म्हणाले की, “ते ती कविता छापणारच!”
मग मी त्यांना एक अट घातली. ती अट अशी होती की, “कविता छापा पण त्याखाली माझे नाव लिहू नका.” सरांनी ती अट मान्य केली आणि माझ्या आयुष्यातली माझी पहिली कविता ही आमच्या कॉलेजच्या ‘हाॅरिझॉन’ या मासिकात ‘अनामिका’ या नावाने छापून आली. छोटेसे कॉलेज होते. त्यामुळे शेवटी सगळ्यांना कळलेच की, ती कविता माझी आहे. खूप कौतुक झाले, कदाचित आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी असेल! म्हणूनही. याचा परिणाम असा झाला की, त्यानंतर कॉलेजची सहल एका समुद्रकिनाऱ्यावर गेली आणि चक्क मी लाटांवर कविता लिहिली आणि माझ्या लक्षात आले की, मी कुठेही गेले, काहीही केले तरी काहीतरी मला कविता सुचत गेली.
कॉलेज संपल्यावर संसार, मूलबाळ, नोकरी याच्यात इतका वेळ गेला की, वीस वर्षे मी कवितेपासून वेगळी झाले. त्यानंतर एकदा आईकडे गेले असता सहजच आई म्हणाली की, “हे बघ या नवाकाळ या पेपरमध्ये कवितास्पर्धेची जाहिरात आलेली आहे, तू भाग घे.” मी घरी सासू-सासऱ्यांना विचारले आणि त्यांनीही होकार दिला आणि मी त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेले. त्या स्पर्धेत चक्क मला पहिले पारितोषिक मिळाले. यामागचे कारण खरे तर वासरात लंगडी गाय शहाणी असेल. पण ती सगळी खूपच तरुण मुलं होती. त्यात मी सर्वात सीनिअर अशी व्यक्ती होते. फक्त त्या स्पर्धेचे पारितोषिक मला ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांच्या हस्ते मिळाले आणि त्यांनी सांगितले की, तू चांगली कविता लिहू शकतेस! ही माझ्या आयुष्यातील कविता लिहिण्याची सुरुवात.
यानिमित्ताने मला खरंच सांगायला आवडेल की, ‘शिक्षक विद्यार्थी घडवतात’ हे माझ्या बाबतीत अनेक वेळा मला दिसून आले. त्याचप्रमाणे कविता लिहिण्याची सुरुवातही माझ्या शिक्षकांमुळेच आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच झाली. त्यानंतर मी माझ्या कवितांचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला, ज्याचे नाव ‘मी प्रतिभा, माझी प्रतिभा’ आणि त्या कार्यक्रमाला आमच्या कॉलेजचे इसराणी सर यांना आवर्जून बोलावले. ते आले. त्यांनी खूप कौतुक केले. अगदी कॅमेरातल्या ३६ फोटोंचा रोल त्यांनी त्या कार्यक्रमात माझे फोटो काढून संपवला. तो अल्बम मला गिफ्ट केला. काळाने १८० अंशांतून माझी मानसिकता बदलवली.
अलीकडे माझ्या नावामागे ‘कवयित्री’ लिहावे, असे मला मनापासून वाटू लागले आहे. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज मी जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले. तेव्हा मला असं वाटतं की, मी सुद्धा माझे विद्यार्थी घडवावे. मला माहीत नाही की, मी कितपत हे काम करू शकले. पण विद्यार्थी भेटतात, बोलतात तेव्हा बरे वाटते. आपण काही ठरवले होते, ते खरे झाले, असे वाटू लागले आहे. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे माझा आज वाढदिवस आणि माझ्या तेजश्री पाताडे या विद्यार्थिनींने
पाठवलेला मेसेज –
“पुस्तकी प्रश्न सोडवणारे बरेच
शिक्षक आहेत…
पण आयुष्याचे प्रश्न सोडवणाऱ्या
तुम्ही आहात…”
ही जर तिची कविता असेल किंवा तिच्या मनातील भाव असेल, काहीही असो शिक्षक म्हणून माझे आयुष्य मला सार्थकी लागल्यासारखे वाटले!
-प्रा. प्रतिभा सराफ