नागपूर : वेगवेगळ्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज नागपुरात झाले. यावेळी त्यांनी या प्रकल्पांचा उल्लेख महाराष्ट्राच्या विकासाचे अकरा नक्षत्र असा केला.
मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, “आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो.
आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन” ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ सिताऱ्यांचे महान नक्षत्राचा उदय होत आहे.
मोदी म्हणाले,
पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.
दुसरा तारा नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होईल.
तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे.
चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेले आयसीएमआरचे रिसर्च सेंटर,
पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर.
सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प,
सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचे भूमिपूजन.
आठवा तारा नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस.
नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प.
दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प.
अकरावा तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचं लोकार्पण आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला अकरा ताऱ्यांचे हे नक्षत्र नवी दिशा देईन. नवी उर्जा देईन. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या अमृतमहोत्सवात ७५ हजार कोटी रुपयांच्या या विकास कामांना महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन.