
कुटुंब आणि समाज स्वास्थ्य हे स्त्रीच्या आरोग्यावर अवलंबून असते. (Health care) आजही कोणत्याही समाजात दिसते की, घरातील स्त्री गेली किंवा तिला गंभीर आजाराने ग्रासले, तर त्याचे दूरगामी परिणाम तिची मुले, संपूर्ण कुटुंबावर होतात. यावरून स्त्रीचे आरोग्य हा विषय किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येते.
स्त्रीच्या आरोग्याशी निगडित जगभरातील सर्व्हेनुसार काय वास्तव आहे, हेदेखील जाणून घेण्यासारखे आहे. जगभरात पाहिले, तर जपानी स्त्रिया अधिक निरोगी आहेत. अमेरिकेतील स्त्रिया सर्वात जास्त म्हणजे जवळपास ४३ टक्के स्थूल आहेत. फक्त भारत देशाचा विचार केला तरी केरळ, गोवा, मणिपूर, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यातील स्त्रिया इतर राज्यांच्या तुलनेत निरोगी आहेत. एकूण आरोग्य या क्षेत्राचा विचार केला तरी लक्षात येते की, मुळात हेच क्षेत्र खूप दुर्लक्षित, त्यात फक्त स्त्रियांचे आरोग्य हा तर अधिकच दुर्लक्षित विषय. किंबहुना त्याला प्राधान्य कमी.
- आज तंत्रज्ञान विज्ञान क्षेत्रात स्त्रिया हळूहळू आघाडीवर येताना दिसत आहेत. पण संख्या खूपच कमी आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर त्याचा अनेक अंगांनी विचार व्हायला हवा.
- मुळात स्त्रीचे आरोग्य हा स्वतंत्र विषय आहे, ही मानसिकता तयार झाली पाहिजे. पुढील विषय त्या आनुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
- स्त्रीच्या आयुष्यात नैसर्गिक असणारी स्थित्यंतरे किंवा टप्पे यात स्वास्थ्य सांभाळणे अधिक गरजेचे असते. हे टप्पे साधारण सात अवस्थांशी निगडित आहेत.
- बाल्य, पौगंडावस्था, गर्भधारणेचा काळ, रजोनिवृत्तीपूर्व, रजोनिवृत्ती पश्चात काल आणि वृद्धावस्था. या स्थित्यंतराच्या कालावधीमध्ये बदल घडत असतो. त्यामुळे आरोग्याचा विचार करताना त्याचा संबंध महत्त्वपूर्ण आहे.
- स्त्रियांनी स्वत:ला निरोगी किंवा स्वस्थ ठेवण्यासाठी पुढील पंचसूत्रीचा अवलंब करावा.
- आपल्याला आवडेल तो व्यायामाचा प्रकार शोधावा. तो स्वत:च्या आठवड्यातील दिनक्रमाचा भाग करून घ्यायचा. म्हणजे तो सवयीचा होत जाईल. नियमित व्यायाम करण्याचा मुख्य फायदा म्हणजे रक्ताभिसरण चांगले राहू शकते. जीर्ण आजार होण्यापासून बचाव होऊ शकतो.
- सामान्य नैदानिक तपासणी करणे याबद्दल सजग व्हायचे. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक तपासणी करणे गंभीर आजार होण्यापासून नक्की वाचवू शकेल.
- योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे. आपले काम त्यात येणारा शारीरिक, मानसिक ताण यावर झोपेमुळे विश्रांती मिळते.
- स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. यात स्वार्थ नक्कीच आहे. पण त्याचा उपयोग स्वत:बरोबर कुटुंब आणि पर्यायाने समाजस्वास्थ्य बळकट करण्यासाठीच होतो.
- आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी याकडेही वेळीच लक्ष देण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
- ही पंचसूत्री जेवढी लवकर समजेल तेवढे आरोग्य सांभाळणे सोपे होऊ शकेल.
- याखेरीज पाहू या प्रायः आपण स्वस्थ आहोत, हे समजण्याचे काही parameters - योग्य वजन, योग्य लयबद्ध हृदयगती RHR (rhythmic heart rate), दिवसभर सर्व गोष्टी करताना ताकद, उत्साह तेवढाच टिकणे, लघवी स्वच्छ होणे, कोणतीही जखम झाल्यास लवकर भरून येणे, त्वचा विशेषेकरून ओठांची त्वचा नितळ असणे या सामान्य लक्षणावरून साधारण स्वास्थ्य बरे आहे, असे समजायला हरकत नाही.
- आरोग्य विमा किंवा सरकारी योजना कोणत्या असतील, तर त्याविषयी माहिती घेतली पाहिजे. बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना अशा कितीतरी योजना आहेत, त्याची नेमकी माहिती घेतली पाहिजे.
- साक्षरता आणि सुजाणता या गुणांची स्त्रीस्वास्थ्यासाठी खूप आवश्यकता आहे. शिक्षणाने स्त्रीचा व्यक्तिमत्त्व विकास अधिक चांगला होऊ शकतो.
- आर्थिक स्तरावर सक्षम असणे हीदेखील महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त त्यासाठी स्वातंत्र्य, गरजा आणि खरी निकड याचा मेळ साधता आला पाहिजे. ·अष्टभुजा देवीसारखे सर्व आघाड्यांवर आपणही तेवढ्याच ताकदीने करू शकतो, अशी स्वत:बद्दल भ्रामक कल्पना करून घेऊ नये. आपली क्षमता आणि मर्यादा समजून युक्तीपूर्वक शक्ती वापरावी. ·
थोडक्यात आपले आरोग्य आपल्या हाती हे सूत्र ध्यानात ठेवले पाहिजे. वैयक्तिक स्वास्थ्य सांभाळले, तर नक्कीच हळूहळू सामूहिक स्तरात पुढे संघटित समाजात हा विषय रूपांतरित होऊ शकेल. भारतातील निरोगी स्त्रियांचे प्रमाण वाढू लागेल. शाश्वत आरोग्याशी निगडित बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडवायला मदत होऊ शकेल. महिलांचे आरोग्य समोर आणि केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे - ते सहसा नसते; परंतु ते असणे आवश्यक आहे. - सिंथिया निक्सन
-डॉ. लीना राजवाडे