
दोहा : मोरोक्कोच्या संघाने पोर्तुगालवर १-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत त्यांनी स्थान पटकावले. फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्का हा आफ्रिकन खंडातील पहिलाच देश ठरला आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा दिग्गज खेळाडू मैदानात उतरूनही पोर्तुगालचा संघ फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. मोरोक्कोच्या संघाला सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला यश मिळाले. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला मोरोक्कोच्या नेयसरीने गोल केला आणि त्याच्या जोरावर मोरोक्कोच्या संघाला आघाडी मिळवता आली. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या सत्रात मोरोक्कोने १-० अशी आघाडी कायम राखली होती.
दुसऱ्या सत्रात मात्र पोर्तुगालने आपला हुकमी एक्का असलेल्या रोनाल्डोला मैदानात उतरवले. या सामन्यातत रोनाल्डोकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. कारण पोर्तुगालला कोणत्याही परिस्थितीत गोल करायचा होता. कारण त्यांना पहिल्यांदा सामन्यात बरोबरी करावी लागणार होती आणि त्यानंतर त्यांना विजयाचा विचार करता आला असता.
पण यावेळी त्यांना मोरोक्कोच्या संघाशी बरोबरीही करता आली नाही. दुसऱ्या सत्रात पोर्तुगालच्या संघाने जोरदार आक्रमणे केली खरी, पण मोरोक्कोने ही सर्व आक्रमणे थोपवून लावली. खासकरून त्यांनी दुसऱ्या सत्रात चांगला बचाव केला आणि त्यामुळेच त्यांना हा दिनाखदार विजय मिळवता आला.