Tuesday, March 25, 2025
Homeमहत्वाची बातमीDabhol Bay Kandal Forest Conservation : सुंदर खाडी, फिरायला होडी’ स्थानिकांची संकल्पना...

Dabhol Bay Kandal Forest Conservation : सुंदर खाडी, फिरायला होडी’ स्थानिकांची संकल्पना यशस्वी

खेड (प्रतिनिधी) : खेड आणि चिपळूण तालुक्यांना विभागणाऱ्या जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांचा संगम असलेल्या दाभोळ खाडी (Dabhol Bay Kandal Forest Conservation) किनारी भागातील सोनगाव आणि कोतवली गावच्या परिसरात वनविभागाने कांदळवन संवर्धन अभियानांतर्गत पर्यटकांना मगर दर्शन करण्यासाठी खास बोट उपलब्ध करून दिली आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात आता कांदळवन आणि मगर दर्शनासाठी पर्यटकांना नवीन द्वार खुले झाले आहे. ‘सुंदर खाडी आणि फिरायला होडी’ ही संकल्पना येथील गावांनी राबविली व ती कमालीची यशस्वी झाली आहे.

कोकण म्हटलं की, निळाशार समुद्र आणि आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे उंच उंच कडे खोल दऱ्या, नारळ सुपारीच्या बागा आणि हिरवा शालू पांघरलेली धरती हे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक कोकणात येतात. मात्र, आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आता वनविभागाने आनंदाची बातमी दिली आहे. दाभोळ वाशिष्ठी खाडीमध्ये आता बोट सफर करता येणार असून, खेडमधील सोनगाव कोतवली गावच्या परिसरात कांदळवन पाहणी आणि महाकाय मगरीचे दर्शन घडविण्यासाठी वनविभागाच्यावतीने खास बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुक्यातील सोनगाव, कोतवली, आयनी या खाडीकिनारी भागातील खाडीकिनारी असणाऱ्या गावांच्या लहान लहान बंदरांवर स्थानिक मच्छीमारांच्या बोटीही पर्यटकांना खुणावत आहेत. ‘सुंदर खाडी आणि फिरायला होडी’ ही संकल्पना या ठिकाणी राबविली जात आहे. समुद्राच्या खाडीकिनारी असणारे कांदळवन म्हणजे नैसर्गिकरीत्या सुरक्षिततेचे कवच असते. दुर्मीळ कांदळवन हा वनस्पतींचा एक विशेष गट आहे. ज्यामध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती किंवा जमिनीलगत वाढणाऱ्या वेली प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे.

कांदळवने भरती-ओहोटी दरम्यानच्या कठीण पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेतात. समुद्राच्या लाटांमुळे होणारी जमिनीची धूप थांबवितात. हेच नव्हे तर कांदळवानांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. दुर्मीळ पक्षी, वनस्पती, वेळी, फुलझाडे, प्राणी, तर अनेक औषधी वनस्पतींचा समावेश या कांदळवनात आढळतो. याच कांदळवनात प्राणी पक्षांबरोबरच महाकाय मगरींचेही वास्तव्य असते. खेडमधील सोनगाव, कोतवली, आयनी या गावांचा परिसर राज्य शासनाने कांदळवन आरक्षित केला असून, तो पर्यटकांसाठी खुला केला आहे आणि आता सुंदर खाडीत निसर्गाने नटलेले कांदळवन आणि महाकाय मगरी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -