मानवी गरजा आणि कल्पनांचा आविष्कार खेळण्यांमधून दिसून येतो. (Culture bond) खेळणी ही विरंगुळ्यासाठी निर्माण होताना त्यामागील कल्पकतेचा भाग भोवतालच्या निसर्गातल्या निरीक्षण, जीवनानुभवातून आलेल्या आकलनातून आलेला आहे. अन्न मिळवण्यासाठी माणसाने लाकूड तसंच विविध धातूंमधून घडवलेली हत्यारे हीसुद्धा एक कलाच होती.
अन्नाच्या गरजेपोटी शिकारीच्या निमित्ताने ही हत्यारे घडवणाऱ्या माणसाने ती निर्माण करताना वेगवेगळ्या आकार-प्रकाराची, लांबी-रुंदी आणि जाडीची, धारदार अशीच तयार केली. अर्थात, निर्मिती करतानाही एक प्रमाणबद्धता त्याच्या बुद्धीने निश्चित केलेली दिसून येते. निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर चुकत-माकत, घडत बिघडत त्याने मूलभूत गरजांपलीकडच्या फावल्या वेळातील आपल्या जगाला अर्थ आणि आकार देण्यासाठी विविध गोष्टी निर्माण केल्या. मानवी जीवन व्यवहार हा परस्पर संबंधांवर, समूहावर अवलंबून असल्यामुळेच बहुविध पर्यायांमध्ये त्याचेच प्रतिबिंब उमटलेले दिसून येईल.
मनोरंजनासाठी अस्तित्वात आलेल्या कला, खेळ हे त्याचेच एक रूप म्हणता येईल. या खेळांमध्ये सागरगोटे, कवड्या, काचापाणी, विटीदांडू, भोवरा, खुळखुळ्यासारखी आवाजी खेळणी, बाहुल्या, प्राण्यांच्या प्रतिकृती किंवा चित्रं असे अनेक प्रकार होते, जे कुठूनही कुठेही घेऊन जाणे शक्य असे. एकट्याने तर कधी दोनपेक्षा अधिक संख्येने खेळण्यासाठीही यापैकी एका खेळाची निवड करता येई. स्थिर आणि चल स्वरूपाचे हे खेळ लहान मुलांमध्ये एकोपा, संघभावना वाढीस लागण्यासाठी, एकाग्रतेसाठी, तर बुद्धिबळ, सारीपाटासारख्या खेळांतून बुद्धिकौशल्य विकासासाठी खेळले जात असत. शारीरिक चलनवलन आणि बुद्धीचा कस लागावा अशीच बहुधा त्या खेळांच्या निर्मितीमागची भावना असावी.
सिंधू संस्कृतीच्या खुणा असलेल्या मोहंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननादरम्यान सापडलेली मातीची खेळणी, मौर्य वा त्यापूर्वीच्या काळातील पाटणा, मथुरा, कौशांबी येथे सापडलेली खेळणी, खेळण्यांचे साचे; शुंग राजवटीत मेंढे जुंपलेल्या गाड्यांची खेळणी, कुशाण काळामध्ये चारही बाजूंनी कोरलेल्या बाहुल्या, तर गुप्त साम्राज्यामध्ये रेखीव, सुंदर लांबट चेहऱ्याच्या बाहुल्या असे वेगवेगळे खेळसाहित्य आतापर्यंतच्या पुरातत्त्वीय उत्खननांतून समोर आले आहे. खेळणे म्हणून बाहुल्यांचा उपयोग होता तसाच जारणमारण क्रियांसाठीदेखील त्यांचा वापर होत असे.
इतिहासामधून तत्कालीन लोकजीवनाचा सांस्कृतिक कल जसा दिसून येतो, तसाच खेळांच्या इतिहासातून समाजजीवनाचाही आडाखा बांधता येतो. दगड, माती, कापड, धातू, हस्तिदंत, रत्नं, हाडं, प्राण्यांची शिंग अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून खेळणी घडवली गेली. सिंधुदुर्गामध्ये खेळण्यांचा हा वसा, वारसा सावंतवाडी परिसरामध्ये आजही अव्याहतपणे सांभाळला जातो आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी आज सिंधुदुर्गाचा ब्रॅण्ड झालेला आहे. भातुकलीच्या खेळापासून ते लाकडातून घडवलेली रेल्वेगाडी, बैलगाड्या, घोडागाडी, चारचाकी गाड्या, आकर्षक रंगातली लाकडी फळे, लहान पाळणे, आवाजाची खेळणी, भिंगऱ्या, भोवरे, खुळखुळे असे एक ना अनेक प्रकार या ठिकाणी घडवले जातात. खेळण्यांशिवाय स्वयंपाकघरातील विविध लाकडी वस्तू जसे की काथवट, पळ्या, चमचे वगैरे गोष्टी, पूजा सामग्रीमध्ये वापरले जाणारे पाट, चौरंगादी वस्तू याही घडवण्याचं काम इथे होतं.
सावंतवाडीमध्ये सतराव्या, अठराव्या शतकापासून या कलेचा आढळ होतो, अशी लिखित नोंद आहे. सावंतवाडीचे राजे खेम सावंत यांनी गोमांतकातल्या गंजिफा आणि लाकडी खेळणी घडविणाऱ्या या कलाकारांपैकी चितारी समाजातील कै. नारायण केळकर आणि कै. विष्णू म्हापसेकर यांना सावंतवाडीमध्ये आणून त्यांच्या कलेला राजाश्रय दिला. लाखकामामध्ये निष्णांत या कलावंतांच्या चित्रशाळा हे सावंतवाडीचे भूषण होते. कालांतराने त्या बंद झाल्या. मात्र त्या कलेचा वारसा आजही सावंतवाडीत चितारी आणि काणेकर घराणे गेल्या ८ पिढ्या पुढे नेत आहेत. कोरीव कामासाठी एकसंध आणि मऊ लाकूड लागतं. नैसर्गिकरित्याच लाकूड ठिसूळ असल्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी त्यावर लेप लावावा लागतो, यालाच रोगणे असंही म्हणतात. रंगसंगती साधण्यासाठी कधी कधी काळा, तांबडा, पांढरा अशा रंगाचंही लाकूड वापरलं जातं. लाकडातून वस्तू घडवल्यानंतर त्या आकर्षक दिसाव्यात, हुबेहूब वाटाव्यात यासाठी आकर्षक रंगांचा, चकाकीसाठी लाखेचा वा तैलरंगाचा वापर करतात. कधी कधी वस्तू अधिक उठावदार होण्यासाठी घडवलेल्या वस्तूंत खाचा करून त्यामध्ये वेगळा रंग, लाकूड, हस्तिदंत किंवा मणी, शिंपले, लाख असं जडावकाम केलं जातं. काही खेळणी ही मऊ लाकडापासूनही घडवतात. सावंतवाडीची लाकडी खेळणी ही काळा कुडा, पांगारा, हेत या लाकडांपासून तयार होत असत. जात्याच मऊ असलेल्या या लाकडांवर कलाकुसरीचं काम तुलनेने सोपं होत असे. तुकडे केलेलं या झाडांचं लाकूड पावसाळ्याचं पाणी पिऊन उन्हाळ्याचं ऊन खाऊन तयार होई. वाळलेले हे तुकडेच जणू काही आपल्यामधून कोणतं खेळणं किंवा फळ, वस्तू घडवायची ते सुचवतं.
प्राथमिक पातळीवर कोयत्याने साधारण आकार दिल्यानंतर ड्रिल मशीन, करवत अशा हत्यारांनी लाकडातून वस्तू आकाराला येते. वस्तूंना तापवून त्यावरचा खडबडीतपणा लोखंडी पट्टीने घासून नंतर कानशीने प्रत्यक्षातल्या प्रमाणे दिसणारा आकार दिला जातो. खेळणी तयार होताना लाकडांचे भाग जोडावे लागतात, तर फळं एकाच लाकडात तयार होतात. चिंचोक्याची खळ, चिकणमाती, लाख, तैलरंग, पॉलिशपेपर असं करत करत ही खेळणी तयार होतात. सावंतवाडीतल्या चितारी समाजातील अमितने जे. जे. कला महाविद्यालयातून कलाशिक्षण घेत काळाची पावलं ओळखून या परंपरागत कलेमध्ये बदल केले आहेत.
आधुनिक यंत्रसामग्रीची मदत घेऊन उत्पादन आणि दर्जा यांचाही स्तर उंचावला आहे. परंपरा आणि नवता यांची सांगड घालत अमितने गोवा, बंगळूरु, गुजरात इथपर्यंत खेळण्याची लोकप्रियता नेलेली आहे. लाकडी खेळण्यांची लिखित नोंद शिवकाळादरम्यानची असली तरीदेखील वर म्हटल्याप्रमाणे इतिहासामधून जसे समाजातील सांस्कृतिक पार्श्वभूमी कळते तशाच संस्कृतीमधूनही समाजातल्या रीतीपरंपरा कळतात. अर्थात समाजजीवन कळण्यास मदतच होते. सावंतवाडीमध्ये लाकडी खेळण्यांना राजाश्रय मिळण्यापूर्वी गोमांतकातल्या लोकपरंपरांमध्ये यांचे धागेदोरे दिसतात. नवविवाहितांना गोव्यामध्ये वज दिला जातो. नवविवाहितेला माहेराहून गणेशचतुर्थीपूर्वी रंगीत पाट, विळी, लाकडी खेळणी, पोळपाट – लाटणं वगैरे वस्तू देण्याची परंपरा आहे. याला ‘वज’ म्हटलं जातं. हा ‘वज’ घडवून घेण्यासाठी गणपतीपूर्वी लाकडी खेळण्यांच्या कारखान्यात गर्दी होते. सासुरवाशीणीला दिलं जाणारं हे सामान (वाण) म्हणजे संस्कृतीचा वेगळा चेहरा आहे.
-अनुराधा परब