न्यायाची निव न्यायालयावर अवलंबून असते व आपल्या पक्षकाराला न्याय कसा मिळेल याची जबाबदारी ही प्रत्येक वकिलावर असते. सत्याला हाराची भीती कधीच नसते. (Crime) वकील आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या कुशल बुद्धीचा, अनुभवांचा कस पणाला लावत असतात.
धर्मेश आणि जितेश हे दोघे व्यापारी मित्र होते. जितेश याची बोटीचे लोखंड वितळण्याची कंपनी होती. धर्मेश ते लोखंड वितळवण्यासाठी जी काही आयुधे लागतात ते पुरवण्याची त्याची कंपनी होती. त्यामुळे सतत दोघांमध्ये देवाण-घेवाणीचे व्यवहार होत. त्याचप्रमाणे पैशांचे, चेकचे व्यवहार सतत होत असत. जितेश याने धर्मेशला दीड करोडचा चेक दिला. हा चेक बाऊन्स झाल्यामुळे, धर्मेश याने जितेशला वकिलामार्फत नोटीस पाठवली. त्या नोटिशीत जितेश याने धर्मेशला उत्तर दिले व पुढे दोघांमध्ये कोणताही समझोता झाला नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. धर्मेश याने जितेशला बोटीचे लोखंड वितळण्यासाठी आयुधे पुरवली होती त्याचे हे पैसे होते. असे धर्मेशचे मत होते.
न्यायालयात केस चालू झाल्यानंतर धर्मेश यांचे वकील महत्त्वाचे मुद्दे आणि त्याला असणारे पुरावे सिद्ध करू शकले नाहीत. त्याच्यामुळे धर्मेश हे केस हरण्याचे जास्त चान्सेस वाटू लागले. म्हणून धर्मेश याने जितेश यांच्या वकिलाशी संपर्क साधून, तुम्ही ही केस हरा. त्या बदल्यात मी तुम्हाला पाच लाख रुपये देतो, अशी धर्मेशने जितेश यांच्या वकिलांना ऑफर दिली. त्यामुळे पैशाला लालची असलेल्या वकिलाने कोर्टामध्ये आपल्या पक्षकाराचे म्हणणे पुरावे जाणून-बुजून सिद्ध केले नाहीत व आरोपी असलेल्या जितेशला ही केस जिंकता जिंकता हरावी लागली. आपली बाजू योग्य होती. आपल्याकडे पुरावे होते. मग आपण केस हरलो कसे. म्हणून त्याने हे प्रकरण अपिलामध्ये घेतले. अपिलामध्ये गेल्यानंतर जितेशला सर्व गोष्टी समजल्या की, आपल्या वकिलाने आपल्याला फसवलेलं आहे व जितेश याने वकिलाच्या संबंधित गोष्टी संदर्भात निदर्शनात्मक आव्हान केले व बार कौन्सिल या ठिकाणी त्यांची तक्रार नोंदवली. अपिलामध्ये गेल्यानंतर आरोपी असलेल्या जितेश याची निर्दोष मुक्तता झाली. ज्या वकिलामार्फत त्यांनी पहिल्यांदा केस दाखल केली होती त्या वकिलावर वकिली अधिनियम या अंतर्गत कारवाईसाठी अर्ज दाखल केला आहे, त्याची प्रक्रिया ही सुनावणीसाठी न्यायालयात प्रलंबित आहे.
पैशाच्या लालचीपणापोटी आपल्या पक्षाकराची बेईमानी गद्दारी करणाऱ्या वकिलाला पक्षकाराने बार कौन्सिल समोर उभे केले व वकिली अधिनियमाच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी केसही दाखल केली. पैशाच्या लालचीपोटी एका वकिलाने स्वतःच्या पेशाशी बेईमानी केली. स्वतःचं जिंकणं महत्त्वाचे असण्यापेक्षा गद्दार वकिलाला पैसा महत्त्वाचा वाटला आणि स्वतःची कष्ट करून मिळवलेली सनद अडचणीत आणली. (सत्य घटनेवर आधारित)
-अॅड. रिया करंजकर