Friday, May 9, 2025

कोलाज

घडी दो घडी

घडी दो घडी

“घडी दो घडी, ये संसार हैं
सब दो दिन का, मामला हैं,
क्षण दो क्षणका, मंच हैं अपना
हम उसीके हीरो हैं!”
हे गाणं विश्वंभरला भारी आवडे. कारण सामान्य माणसाला हीरो म्हटलं होतं. विशूला ते आपलंसं वाटे. एक दिवस बायको म्हणाली, “अहो, मी काय म्हणते, आपण दोन दिवस गावाला जाऊ या का?”
“हो. कुठे जाऊया?” विशूने विचारले.
“तुमच्या माहेरी नको नि माझ्याही माहेरी नको. माथेरानला जाऊया. कुणी ओळखीचं नक्कोच. गिरीविहारमध्ये कबुतराच्या जोडीगत राहू.”
“बायको, विचार गोड आहे. पाखरू झालंय बघ मन. पंख फुटलेत देहाला.”
“खरंच?”
“अगदी खरं.”
“आई एकट्या पडतील, त्यांना त्यांच्या बहिणीकडे सोडू.”
“गुड आयडिया. माई मावशीकडे सोडूया. जाम खूश होतील बहिणी बहिणी. ताई मावशीला मी घेऊन येतो. माई-ताई नि बाई.”
“मज्जाच मज्जा.” बायकोनं टाळी वाजवली. खुशी खुशी.
“घडी दो घडी मज्जा करेंगे
घडी दो घडी जग को भुलेंगे” त्याच्या विधानावर बायको जामेजाम खूश होती. कोणाला आवडत नाही हो जग-जबाबदारीतून मोकळं फ्री-मुक्त पाखरू व्हायला? साऱ्यांना त्याची आस असते, पण जमत नाही.
“माथेरान ही जागा छान! जवळ नि मस्त! हिशेबात बसणारी. घडी दो घडी की मज्जा के लिये बहुत अच्छी!” बायको म्हणाली.
“तू ठरव. घडी दो घडी आप कहे... हम सुने.”
“नवऱ्या, तू खूप गोड आहेस.” तिने नवऱ्याच्या गालावर थोपटलं. तो आणखीच सुखावला.
ताई-आई नि बाई, त्रिकूट छान जमलं. ‘बहिणी’ संमेलन भगिनीमंडळ रंगलं गप्पाष्टकात. रमलं! चक्क त्रिकुटाची मज्जा एक रात्र अनुभवून विशू नि तनू निघाले माथेरान यात्रेला.
जवळचं ओळखीचं कोणी भेटू नये असं वाटत होतं दोघांना. गुटरघू... कबुतरं जशी! म्हणून बुध-गुरू हे वर्किंग डे निवडले. कुण्णी जव्वळसुद्धा नको होतं त्यांना आणि तस्संच झालं. वर्किंग डेज लोक खाली मान घालून ‘टेबल वर्क’ करीत होते नि हे दोघं मज्जा करायला रजा काढून बाहेर पडले होते.
पण माथेरान फुल्ल हो! गिरिविहार फुल्लम फुल्ल.
नशिबाने अस्मिता भेटली. विशूच्या ऑफिसात त्याची असिस्टंट.
“सर, तुम्ही इथे?” तिने विचारले.
“घडी दो घडी ये संसार हैं, सब दो दिनका मामला हैं!
त्याने ओळी म्हटल्या नि ऑफिसच्या सखीने त्या पूर्ण केल्या.
“क्षण दो क्षणका मामला हैं अपना
हम उसी के हीरो हैं!”
“अरे वा! मैत्रिणी, तुला येतं?”
“नवरा बायकोच्या ‘चेंज’चं हे भरतवाक्य आहे मित्रा.”
“खरंच आहे. रुटिननं आंबून जातं हे शरीर!” तो म्हणाला.
“ये वंगण हैं अपना.” ती उत्साहाने सोडा वॉटरची बाटली होऊन फसफसली.
“किती वेगळं बोललीस तू!”
ती ड्रेस घालून सजली होती. ऑफिसपेक्षा तरुण, छान वाटत होती.
वेगळीच तकाकी तिच्या चेहऱ्यावर होती.
“विश्वंभर, बायको कुठाय?”
“ही आले बघ.”
“किती छान दिसतेयस?”
“छान नटले आहे ना. फ्री... ब्रेक फ्री. नो लोकल ट्रेनची गर्दी. नो लेट मार्कचं टेन्शन. बॉस म्हणाला, जा! ताणरहित होऊन या. हीरोगिरी करून या.”
“असं म्हणाले बॉस?”
“हो. का गं?”
“अगं मला सुद्धा हे नि असंच म्हणाले माझे बॉस.”
“काय सांगतेस?”
“बॉसला पुरतं ठाऊक आहे. घडी दो घडी, जबाबदारी विसरून राजा होण्याचा हक्क प्रत्येकाला आहे!” किती खरं ना?


-डॉ. विजया वाड

Comments
Add Comment