
जागतिक रॅकेटबाॅलच्या अंतिम सामन्यात रूबेन गोंझालेसने शेवटच्या गेममधील, मॅच पॉइंट वाचविण्यासाठी अप्रतिम फटका मारला. (Bouquet) त्याला विजेता म्हणून घोषित करताच गोंझालेस क्षणभर गोंधळला. वळून प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन करताना म्हणाला, तो फटका चुकीचा होता. यामुळे गोंझालेसने सर्व्हिस आणि सामनाही गमावला. सर्वजण स्तंभित झाले. गोंझालेस म्हणाला, “माझी सचोटी, प्रामाणिकपणा आणि विवेकबुद्धी यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही. या खिलाडूवृत्तीमुळे गोंझालेस सामना हरूनही विजेता होता.
बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच खेळ खेळायला, बघायला आवडतो. काही क्रीडाप्रेमी खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी, खेळाचा आनंद घेण्यासाठी, देशांत, परदेशात जातात. विविध क्रीडा प्रकारातले अनेक खेळाडू आज करोडो लोकांचे आयडॉल आहेत.
मैदानावरच्या खेळाबरोबरच खेळाडूचे प्रत्येक पाऊल, करोडो लोकांना नकळत शिकवण देत असते. खेळांत लोकांना अस्वस्थ करणारे अशोभनीय वर्तनाचे प्रसंग घडतात. त्याचबरोबर एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे, प्रतिस्पर्ध्यांविषयी आदर राखत कौतुक करणारे, नैतिकतेने खेळाच्या नियमानुसार, सन्मानाने विजयाचा पाठपुरावा करणारे, अशा खिलाडूवृत्तीचे खेळाडू जगात खूप आहेत. त्यांचीच काही उदाहरणे -
१. प्रतिस्पर्ध्याला जिंकण्यासाठी मदत करणे : २ डिसेंबर २०१३ स्पेनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात केनियाचा धावपटू ‘एबल म्युतय’ पहिल्या क्रमांकाशी अवघ्या दहा मीटर अंतरावर होता. प्रेक्षकांच्या जल्लोशामुळे एबल काहीसा गोंधळला आणि अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपण विजयी असे समजून थांबला. त्याच्यापाठी दुसऱ्या क्रमांकावर असणारा स्पेनचा इव्हाॅन फर्नांडिस यांनी एबलचा झालेला गोंधळ ओळखला. स्वतः मागे राहून एबलला विजयी रेषेच्या पार ढकलले. एबल म्युतय विजयी झाला. तू असे का केलेस? पत्रकारांशी बोलताना इव्हाॅन म्हणाला, त्याला स्पॅनिश कळत नसल्याने त्याचा गोंधळ झाला. मी त्याला विजयी केले नाही तो विजय त्यांचाच होता.
२. प्रतिस्पर्ध्याशी सन्मानाने वागणे : २०१४च्या विश्वचषक दरम्यान कोलंबियाच्या संघाचा फुटबाॅलपटू राॅड्रिग्जने सहा गोल करीत विक्रमी कामगिरी केली; परंतु कोलम्बिया संघाचा पराभव झाल्याने राॅड्रिग्जचे विश्वचषकातले स्थानाचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याची निराशा प्रतिस्पर्धी ब्राझील संघातील बचावपटू डेव्हिड लुईसच्या लक्षात आली. लुईस स्वतःबरोबर गर्दीला घेऊन राॅड्रिग्जकडे गेला. त्यामुळे राॅड्रिग्जच्या कामगिरीला आणि विजेत्या ब्राझील संघाला सारखीच दाद मिळाली.
३. चांगला खेळाडू दुसऱ्याला प्रोत्साहित करतो : जेसी ओवेन्स! एक अव्वल आफ्रिकन अमेरिकन अॅथलेटिक. लांब उडीच्या पात्रता दरम्यान कठोर संघर्ष करूनही दोनदा फाऊल झाला. तिसऱ्या फेरीत ओवेन्स स्पर्धेच्या बाहेर जाऊ नये म्हणून जर्मन स्पर्धक लुटझलॉगने नाझी पक्षांच्या वर्णद्वेषी धोरणांना न जुमानता ओवेन्सचा फॉर्म सुधारण्यासाठी मदत केली. त्याच ओवेन्सने ऑलिम्पिकमध्ये
सुवर्णपदक जिंकले.
४. ‘सन्मानाने जिंका आणि सन्मानाने हरा...’ : १९९६च्या यूएस ओपनमध्ये शेवटच्या फेरीच्या सुरुवातीला टॉम लेहमनने प्रतिस्पर्धी स्टीव्ह जोन्सवर छोटी आघाडी घेतली. लेहमनने मोठ्याने प्रार्थना करून जोन्सला तू बलवान आणि धैर्यवान असल्याची आठवण करून दिली. शेवटी एका शॉटने जोन्सने विजय मिळविला. लेहमनला विचारले गेले, ‘ज्या व्यक्तीला तुला हरवायचे आहे त्याला तू प्रोत्साहन का देत होतास?’ लेहमन स्पष्ट करतो, ‘आम्ही दोघांनी धैर्याने आणि आत्मविश्वासाने जिंकण्यासाठी खेळावे, असे चांगले उदाहरण असावे, अशी माझी इच्छा होती.
५. प्रतिस्पर्ध्यांविषयी आदर :… टोकिओच्या २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये इटलीचा जियानमार्को तांबेरी आणि कतारचा मोताझ बारशीम या दोघांनी उंच उडी स्पर्धेत २.३५ मी., २.३६ मी आणि २.३७ मीटर उंचीचा बार यशस्वीपणे ओलांडला; परंतु त्यानंतर तांबेरीच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने पुढची उडी मारायला नकार दिला. नाइलाजाने सुवर्णपदकाऐवजी तो रौप्य पदकाची अपेक्षा धरतो. गुडघ्याची दुखापत, एका पदकाच्या मोलाची जाणीव खेळाडूंना असते. परत संधी मिळेल न मिळेल! कतारच्या बार्शीमच्या मनात येते, माझ्यापुढे स्पर्धक नाही, मीही उडी मारायला नकार दिला तर? पंच चर्चा करतात. अखेर दोघेही उंच उडीचा सुवर्णपदकाचा आनंद संयुक्तपणे साजरा करतात.
आज राजकारणात, व्यवसायात आपल्याला स्पर्धक राहणार नाही म्हणून लोक प्रयत्नशील असतात. खेळ हे एकमेव क्षेत्र आहे, येथे जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, प्रांत, बॉर्डर या साऱ्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे, खिलाडूवृत्तीने दर्शन घडते. खेळात खिलाडूवृत्ती जागवली जाते.
आपल्या देशातही गुणवतेबरोबरच खिलाडूवृत्तीलाही तेवढेच प्राधान्य देणारे अनेक खेळाडू आहेत.
शैलेश नागवेकर लिहितात, सामर्थ्यवान अॅडाॅल्फ हिटलरने जर्मनीची राष्ट्रीयत्वाची दिलेली ऑफर सन्मानानं नाकारणारे राष्ट्रप्रेमी मेजर ध्यानचंद, मिल्खासिंग, प्रकाश पदुकोण असे दिग्गज नेहमीच खिलाडूवृत्तीसाठी नावाजले जातात. आताची पी. व्ही. सिंधूने निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय मैत्रीचे संबंध. या साऱ्या घटना सुवर्णपदकांप्रमाणे लकाकत असतात.
पालकांनो मुलांना खेळायला पाठवा, खेळ दाखवा, मुले चांगले-वाईट दोन्ही अनुभव पाहतील. ही व्हिज्युअल उदाहरणे उत्कृष्ट शिक्षण साधन आहेत. मनाप्रमाणे मुलांना खेळायला मिळाल्यावर आत्महत्या वाचतील, अभ्यासाची गोडी लागेल. खेळामुळे मुलांमध्ये मैत्री, सहयोग, संघभावना निर्माण होते. मुलांच्या दृष्टिकोनात, स्वभावतः खूप बदल होतो. चक दे चित्रपटात विजयानंतर विमातळावरून घरी जाताना प्रत्येक खेळाडूच्या स्वभावात झालेला बदल छान चित्रित केला आहे. खेळातील हार-जीतमुळे रोजच्या जीवनात सुख दुःखात मुलांना स्थिर राहण्याची सवय लागते.
मुलांना काही मूल्य शिकवा -
१. तुम्ही हरलात, तर सबबी सांगू नका.
२. जिंकलात, तर तो विजय
त्या दिवसाचा भाग असतो.
३. स्वतःचे नेहमी सर्वोत्तम द्या.
४. टीका टाळा, प्रोत्साहन द्या.
५. खेळ संपल्यावर शुभेच्छा द्या.
खिलाडूवृत्तीच्या जोरावर आजन्म जगात सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अनेक खेळाडू आहेत. लक्षात ठेवा प्रत्येकजण जिंकण्यासाठीच खेळतो, असे नाही. खेळात अटीतटीच्या प्रसंगी अंतर्मनाचा आवाज ऐकून न्याय दिला जातो. खिलाडूवृत्ती हा खेळाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आजूबाजूला चांगले खूप काही आहे, ते बघा आणि शिका.
-मृणालिनी कुलकर्णी