जसे सारेजण भक्तीत लीन झालेले पाहिले तसेच देवाला मानत नसणारी एक (Atheist) व्यक्तीही तेवढ्याच प्रकर्षाने पाहण्यात आलेली. बव्हतांशी आस्तिक माणसं जास्त पाहण्यात आली, नास्तिक क्वचित. पण ही आपल्या विचारांवर ठाम दिसून आली. नाही देव मानत तर नाही. कुणाच्या सांगण्यावर आम्ही देवाला हात जोडणारे नाही, अशांपैकीच.
या व्यक्तीचंही तेच म्हणणं होतं. देव मानत नाही आणि देवाला कधी हात जोडत नाही, प्रसादही खात नाही. हे म्हणजे अति झालं. कारण आपण जास्त पुढारलेले आहोत, देव मानत नाही अशा पंक्तीत बसून नंतर संकट आलं की, गुपचूप देवाला हात जोडणाऱ्या माणसांपैकीच हे प्रकरण वाटून गेले. पण नाही ही व्यक्ती देव न मानण्यावर ठामच! आपण मंदिरात गेलो तरी हात जोडतो, आरतीत सामील होतो, प्रसाद खातो. कुणी ध्यान करतं, पूजा-अर्चा सारं आलंच! पण पण इथे गोष्ट निराळी होती. नेहमीच्या रुटीनमध्ये देवासाठी कुठेच जागा दिसली नाही. ना मनात ना घरात.
का? त्याचं कारण मिळालं नाही. देवावर राग आहे अशातलाही भाग नव्हता. पण जी गोष्ट डोळ्यांना दिसत नाही, भासत नाही त्याला हात का जोडावे? कष्ट करा, मनाला ताण न देता स्वस्थ राहा. अशा विचारांशी ठाम राहणारी ही व्यक्ती आपल्या आयुष्यातही ठाम असल्याचे दिसून आले. शिक्षण झाले, नोकरी मिळाली, पण मग विवाहाचा जेव्हा विषय आला तेव्हा मात्र ज्योतिषाकडे जाताना या व्यक्तीच्या हातात पत्रिका पाहिली. तेव्हा मात्र नकळत आश्चर्य वाटून गेलं. भुवया उंचावल्या गेल्या. हे कसं काय शक्य? ही व्यक्ती तर देवाला मानत नाही. मग ज्योतिष शास्त्रावर तरी विश्वास कसा ठेवते? काही कळेनासं झालं.
काहीच मानत नसलेल्या माणसाने चक्क ज्योतिषाकडे जन्मपत्रिका घेऊन जावं? जरा नवलच वाटून गेलं. मात्र या प्रश्नावरही ही व्यक्ती ठाम दिसून आली.
‘मी देव मानत नाही. कारण ते दिसत नाहीत. पण ज्योतिषशास्त्र मानतो. कारण भौगोलिक आहे. जिथे सूर्य, चंद्र, तारे दिसतात, जिथे पौर्णिमा, आमावस्या झालेली आपण पाहतो. जिथे समुद्राची भरती, ओहोटीचं प्रमाण या भौगोलिक चक्रावर ठरतं तिथे ग्रहशास्त्र असल्याचं मनाला पटून जातं. म्हणून ज्योतिषशास्त्र मानतो.’ या उत्तरावर क्षणभर दाद द्यावीशी वाटली. कारण अभ्यासात गुंतलेलं हे मन शाश्वत-अशाश्वत गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा वास्तवावर अधिक भर देणारं ठरलं होतं.
आपण एखाद्याला नास्तिक ठरवताना त्याला पुढारलेल्या विचारांचा मानला, त्यात काहीच गैर वाटलं नाही. दुसऱ्यांनी भक्ती करावी यात त्याला काही गैर वाटत नाही. मग त्याने न केलेल्या भक्तीत आपल्याला तरी का गैर वाटावं?
पत्रिकेवर विश्वास न ठेवणारीही माणसं आज या जगात आहेत, जी देवावर भरवसा ठेवतात. जी आस्तिक आहेत. पण जी व्यक्ती नास्तिक आहे, पण पत्रिका, मंगळ आदी गोष्टींवर विश्वास ठेवते हे देखील उलट पाहण्यात आले, तेव्हा त्याने दिलेले कारणही काही अंशी पटले. त्याच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवण्यामागे त्याने तसे कारणही स्पष्ट केले. चंद्र, सूर्य साक्षात दाखवले. पण देव का मानत नाही या प्रश्नावर वाद घालण्याचे सामर्थ्य यावेळी आपल्यात नव्हते. कारण त्याने जसे आकाश-पाताळ आणि ग्रह-ताऱ्यांचे संदर्भ दिले तसा साक्षात परमात्मा उभा करून दाखवणं आपल्याला शक्य नसल्याचं जाणवलं.
त्याने पत्रिका ज्योतिषाला दाखवताना ज्योतिषशास्त्र मानले, ज्योतिषाला नमस्कार केला. त्यातच सारं भरून आलं. देव मानणं न मानणं यावर आस्तिक, नास्तिक ठरवणारं मन कुणावर तरी का होईना श्रद्धा ठेवतोच ठेवतो हे यावेळी दिसून आलं इतकंच!
-प्रियानी पाटील