एशिअन फिल्म फाऊंडेशन’तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘थर्ड आय’ आशियाई महोत्सवाची (Asian festival) सुरुवात सोमवार १२ डिसेंबरपासून मुंबईत होत आहे. सुधीर नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली २००२ साली सुरू झालेल्या या महोत्सवाचे हे १९ वे वर्षं आहे. मुंबईमधील चित्रपट रसिकांसाठी आशिया खंडातील समकालीन चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. अशा प्रकारचा हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने संपन्न होत असलेल्या या महोत्सवाला ‘प्रभात’ चित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले तीस चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या श्रीमती आशा पारेख यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ सरथ कोथालावाल आणि कुमारा थिरीमदुरा दिग्दर्शित ‘द न्यूजपेपर’ या श्रीलंकन सिनेमाने होणार आहे. सांगता समारंभात अनिक दत्ता दिग्दर्शित ‘अपराजितो’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
कंट्री फोकस विभागात सहा श्रीलंकन चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून प्रथमच गुजराती चित्रपटांचा विशेष विभाग या महोत्सवात असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘हेल्लारो’ हा अभिषेक शहा दिग्दर्शित चित्रपट या विभागाचे खास आकर्षण असणार आहे. ‘धाड’, ‘२१ एम यू टिफिन’, ‘रेवा’, ‘आ छे मारू गाव’ या गुजराती चित्रपटांचा या विभागात समवेश केला गेला आहे.
बंगाल, मणिपूर, आसाम, गोवा येथे निर्माण झालेले डिक्शनरी, स्तेलोन माय पोनी, गॉड ऑन द बाल्कनी, केजरो या प्रादेशिक चित्रपटांचा समावेश महोत्सवात असून ‘फनरल’, ‘गोदाकाठ’, ‘काळी माती’, ‘भारत माझा देश आहे’, ‘फास’ हे मराठी चित्रपट देखील प्रदर्शित केले जाणार आहेत. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली म्हणून डॉ. संतोष पाठारे दिग्दर्शित ‘सुमित्रा भावे एक समांतर प्रवास’ हा माहितीपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
महोत्सवादरम्यान लघुपटांची स्पर्धा आयोजित केली आहे. एकशे वीस लघुपटांच्या प्रवेशिकांमधून निवडक तीस लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात होणार असून मान्यवर परीक्षक त्यातील दोन लघुपटांना पारितोषिके जाहीर करणार आहेत. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी रवींद्र नाट्य मंदिर येथे दिनांक ५ डिसेंबरपासून सुरू झाली असून प्रतिनिधी शुल्क रु. ५०० / आणि फिल्म सोसायटी सदस्य व विद्यार्थ्यांसाठी रु ३००/ असेल. महोत्सवाची online नोंदणी सुद्धा सुरू झाली आहे.
‘अदृश्य रंगकर्मी’: कोकणातील अंधश्रद्धेवर भाष्य
कोकणातल्या लोककलाकारांना मुंबईत ‘नमन’चे प्रयोग करायचे झाले, तर दामोदर किंवा साहित्य संघ मंदिर हे हक्काचे नाट्यगृह वाटते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे ‘नमन’साठीची तिसरी घंटा वाजलीच नव्हती. आता निर्बंध उठले आहेत म्हणून रविवार १८ डिसेंबर रोजी ‘अदृश्य रंगकर्मी’ या ‘नमन’साठी गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे प्रेक्षकांची गर्दी उसळेल असे दिसते. कवी, वादक, गायक, निर्माते अशोक दुदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘नमन’ला प्रतिष्ठा मिळून देण्यासाठी ते प्रत्येक वर्षी प्रसिद्धी माध्यमांनी दखल घ्यावी असा अभिनव प्रयोग करीत असतात. काही वर्षांपूर्वी आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या षण्मुखानंद या सभागृहात ‘नाद पंढरीचा’ हा प्रयोग त्यांनी केला होता. विक्रमी ठरणारा हा सोहळा होता. त्यानंतर व्यावसायिक कलाकारांना घेऊन ‘साहेब, जागे व्हा’ याचे प्रयोग त्यांनी केले होते आणि आता ‘अदृश्य रंगकर्मी’ या ‘नमन’चे सलग तीन प्रयोग होणार आहेत.
यानिमित्ताने दोन हजारांच्या वर प्रेक्षक या नमनाचा आनंद घेणार आहेत. दिव्या हर्ष एंटरप्राईजेसची ही विक्रमी कलाकृती ठरणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावातील चाळीस कलाकार एकत्र येणार आहेत. रसिकांनी या संस्थेला लोकमान्यता दिलेली आहे. त्याला कारण म्हणजे ७० एम.एम.चा स्क्रीन यावेळी लावला जातो. हे धाडस सहसा कुणी करत नाही. त्यामुळे देव – देवता, गावातील देऊळ यांचे भव्य – दिव्य दर्शन या स्क्रीनवर होणार आहे. श्रवणीय गीत रचना, मोहून टाकणारी नृत्य अदा, प्रेक्षकांचे छान मनोरंजन होऊ शकेल, असे विनोदी, खट्याळ नाट्यप्रवेश असा उच्च प्रतीचा थाट असला तरी पूर्वापार चालत आलेल्या परंपरा यात खंड पडू दिलेला नाही.
पुरुष कलाकारच स्त्रीचा साजशृंगार करून गणगौळणनंतर ‘अदृश्य रंगकर्मी’ ही नाट्य कृती सादर करणार आहेत. प्रेक्षक थक्क होतील, असे काही प्रसंग यात पाहायला मिळणार आहेत. सूर्या गोवळे हा यात मुख्य व्यक्तिरेखा सादर करणार आहे. ‘तेढेमेढे’ या व्यावसायिक नाटकातल्या भूमिकेसाठी त्याला ‘झी’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. नितीन पवार प्रथमच मावशीच्या धमाल भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सकाळी ११, दुपारी ३.३० आणि रात्री ७.३० वाजता असे सलग तीन प्रयोग होणार आहेत. लेखन, दिग्दर्शक रूपेश दुदम यांचे असून नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी विलास विंजले यांच्यावर सोपवलेली आहे. कोकणात जी अंधश्रद्धा फोफावली आहे त्यावर भाष्य करणारे हे लोकनाट्य आहे.
-दीपक परब