विरार (प्रतिनिधी) : कोरोनानंतर प्रत्येकजण आहारासंबंधी जागृत झाला आहे. (Seasonal Fruits) यामध्ये लिंबूवर्गीय फळे खाण्यावर आता भर पडत आहे. मात्र अद्यापही आहारासंबंधी लोकांमध्ये जागृती नसल्याने कोणत्याही ऋतूमध्ये कुठलेही फळे खाल्ली जातात. मात्र ते आरोग्यासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.
सध्या कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या हंगामी फळे चाखायला मिळतात. मात्र ते रासायनिकांनी पिकवले जातात. त्यामुळे आपण आजारांना आमत्रंण देत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हंगामानूसार फळे खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
हिवाळ्यातील पेरू, आवळा, सीताफळ, डाळिंब, पपई, चेरी, रासबेरी, स्ट्रॉबेरी, कच्ची अंजीर, बोर, चिंच, नासपती ही फळे खाल्ली तरी वर्षभरातील शरीराला आवश्यक विविध जीवनसत्त्वांचा अभाव भरून निघतो. त्यामुळे हंगामानुसार फळे खा अन् ठणठणीत राहा, हाच आरोग्यदायी जीवनाचा खरा मंत्र असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक फळाचा ठराविक मोसम असतो. त्यानुसार त्या त्या मोसमात येणारी फळे खावीत.
मात्र, हल्ली बाजारात बाराही महिने विविध प्रकारची फळे मिळू लागली आहेत. ही फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. पुन्हा मिक्सरमध्ये घालून बिनमोसमी फळांचा मिल्कशेक, फ्रूट सलाड करून खाण्याची पद्धतही रूढ झाली आहे. पण हे योग्य नाही. फळे खाताना शक्यतो कच्ची आणि अखंड खावी. या फळांच्या सालींमध्येसुद्धा उपयुक्त गुणधर्म असतात. त्यामुळे शक्यतो कोणतेही फळे खाण्यापेक्षा त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केळी, सफरचंद, पेरू अशी फळे थंडीच्या दिवसांत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
हिवाळ्यातील फळे
स्ट्रॉबेरी : जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड आणि कॅल्शिअम, फॉस्फरस.
पेरू : फोलेट, फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स प्रमाण भरपूर असते.
आवळा : व्हिटॅमिन ‘सी’ आणि फायबर.
कच्चे अंजीर : आर्द्रता, पिष्टमय, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह.
बोर : प्रथिने, कर्बोदके, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’.
सीताफळ : आयर्न, हिमोग्लोबिन, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम.