Friday, July 11, 2025

Ratnagiri ST Division : कर्नाटकला जाणाऱ्या ११ एसटी फेऱ्या रद्द

Ratnagiri ST Division : कर्नाटकला जाणाऱ्या ११ एसटी फेऱ्या रद्द

रत्नागिरी (वार्ताहर) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असून, महाराष्ट्रातील वाहनांवर तेथील कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले झाले. (Ratnagiri ST Division) यामध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.


त्याचा मोठा परिणाम एसटीच्या सार्वजनिक वाहतुकीवर झाला. रत्नागिरी एसटी विभागाने बेळगाव, विजापूर, हुबळीला जाणाऱ्या ११ फेऱ्या रद्द केल्या. कोल्हापूरपर्यंत या फेऱ्या सुरू आहेत, तर कर्नाटक डेपोनेही रत्नागिरीत येणाऱ्या ८ फेऱ्या रद्द ठेवल्या आहेत.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकार अधिक कठोर भूमिका घेत असल्याने कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सीमाभागावर हल्ले करून वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राची वाहने हेरून हे हल्ले होत होते. सीमाभागावर अजूनही वातावरण धुमसत असून कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने ही खबरदारी घेऊन कर्नाटकाकडे होणारी एसटी वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर या वादाचा परिणाम झाला आहे.


महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या आहेत. त्या गेल्या दोन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे, तर अन्य जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज ३३० एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व प्रवाशांना फटका बसू नये यासाठी एसटी फेऱ्या पोलिसांच्या सूचनेवरून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूरपर्यंत या फेऱ्या सुरू असल्याने एसटीच्या उत्पन्नावर तसा फारसा परिणाम झालेला नाही. याला एसटी विभागाने दुजोरा दिला आहे.

Comments
Add Comment