Thursday, July 25, 2024
HomeकोकणरायगडRaigad district : स्थलांतरामुळे गावे पडली ओस

Raigad district : स्थलांतरामुळे गावे पडली ओस

शहराकडे तरुणांचे आकर्षण; ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

अलिबाग (वार्ताहर) : ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची उणीव, रोजगाराची कमतरता, शिक्षणाच्या सुविधांची गैरसोय अशा विविध कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील (Raigad district) ग्रामीण तरुणांचे शहरी भागाकडे आकर्षण वाढत आहे.

मुख्यतः रोजगाराच्या शोधात गावे सोडून शहरी भागाकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येमुळे रायगड जिल्ह्यातील गावे ओस पडू लागली आहेत. कोरोनानंतर कामगार कपातीवर सर्वच उद्योजकांनी भर दिलेला असल्याने गावापासून जवळच कामधंदा मिळविणेही कठीण झाले आहे.

सामाजिक संस्थांच्या वतीने हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी ते खूपच अपुरे पडत आहेत. १९६१ च्या जनगणनेनुसार १० लाख लोकसंख्येपैकी फक्त एक लाख नागरिक शहरी भागात राहत होते, तर आजच्या घडीला अंदाजित २९ लाख लोकसंख्येपैकी १५ लाख नागरिक हे शहरी भागात राहत आहेत, तर ग्रामीण भागात १४ लाख लोक राहत असून, शहरी भागातील लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

कोरोनानंतर ही परिस्थिती आणखीनच वाढत असून, नोकरीच्या शोधात मुंबई, ठाणे, सूरत येथे जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढू लागले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या अहवालानुसार, कोरोनामध्ये सव्वादोन लाख लोक गावाकडे आले होते, त्यापेक्षाही जास्त लोक आता नोकरीधंद्याच्या शोधात शहराकडे परतली आहेत. कोरोनातील लॉकडाऊनमध्ये या लोकांचा रोजगार बुडाला, अनेकांना जवळजवळ वर्षभर घरीच बसावे लागले. यादरम्यान खालावलेली आर्थिकस्थिती भरुन काढण्यासाठी दक्षिण रायगडमधील नागरिकांनी शहराकडे धाव घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
याचमुळे दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, म्हसळा, तळा, रोहा तालुक्यांतील गावे ओस पडू लागली आहेत. गावाकडे घर आहे, परंतु त्या घरात वयोवृद्ध माणसांशिवाय कोणीही राहत नाहीत. कमावत्या व्यक्ती शहरात कामधंद्याच्या शोधात गेल्यावर त्यांच्यापाठोपाठ त्यांनी आपल्या लहान मुलांनाही शिक्षणासाठी स्थलांतरित केल्याचे दिसून येते.यामुळे पनवेल, कर्जत, खालापूर, उरण तालुक्यांची लोकसंख्या वाढत चालली आहे.

दक्षिण रायगडमध्ये स्थलांतरणाचे प्रमाण जास्त आहे. हे स्थलांतर

दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ते रोखण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी दाखविणे गरजेचे आहे. कोरोना कालावधीत कमी उत्पन्न गटातील बहुतांश स्थलांतरित लोक गावाकडे आले होते. त्यापेक्षाही जास्त लोक आता नालासोपारा, सूरत येथे स्थलांतरित झालेत, असे तुषार इनामदार (जिल्हा समन्वयक स्वदेश फाऊंडेशन) यांनी म्हटले़

रायगड जिल्ह्याच्या विकासावरील दृष्टीक्षेप

मानवीविकास निर्देशांक – ०.७५९
दरडोई उत्पन्न – १ लाख ४१
साक्षरता – ८८ टक्के सरासरी
आयुर्मान – ६५ वर्ष

लोकसंख्या वाढीवरील दृष्टिक्षेप (लाखांत)

१९६१ (जनगणना)

शहरी – १.०७
ग्रामीण – ९.५२
एकूण – १०.५९

१९७१ (जनगणना)

शहरी – १.५०
ग्रामीण – ११.१०
एकूण – १२.६३

१९८१ (जनगणना)

शहरी – २.१०
ग्रामीण – १२.७६
एकूण – १४.८६

१९९१ (जनगणना)

शहरी – ३.२९
ग्रामीण – १४.९६
एकूण – १८.२५

२००१ (जनगणना)

शहरी – ५.३५
ग्रामीण – १६.७३
एकूण – २२.०८

२०११ (जनगणना)

शहरी – ९.७०
ग्रामीण – १६.६४
एकूण – २६.३४

२०२१ (अंदाजित)

शहरी – १५.३५
ग्रामीण – १३.६५
एकूण – २९.००

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -