Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Beautification Project : संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प

Mumbai Beautification Project : संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प

मुंबई : मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच (Mumbai Beautification Project) विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार ॲड. आशीष शेलार, आमदार अमित साटम, आमदार डॉ. भारती लव्हेकर, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुंबईचा कायापालट या प्रकल्पाच्या डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील सुशोभीकरणाची कामे झाल्यानंतर मुंबई सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुंबईकरांची आहे. मुंबईचा विकासात्मक बदल करण्यासाठी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेणार आहोत. मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने १५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेत. मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण करणे, स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावर्षी जी-२० परिषदेच्या आयोजनचा मान आपल्या देशाला मिळाला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने मुंबईस‍ह राज्यातील इतर शहरांमध्ये विविध बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी जगभरातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर राज्याचे ब्रॅंडिंग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सामाजिक परिवर्तनाची सुरवात – उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्याची संकल्पना मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मांडली. मुंबई महानगरपालिका सक्षम आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर, सुसज्ज दिसण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत भिंती सुशोभित करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, वीस हजार शौचालये निर्माण करणे आणि ते चोवीस तास स्वच्छ ठेवणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, आकांक्षित शौचालये तयार करण्यासाठी दुप्पट निधी देण्यात येणार आहे. झोपडपट्ट्यांमध्येही या कार्यक्रमांतर्गत आकांक्षित शौचालये, कम्युनिटी वॉशिंग मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच हँगिंग लाईटच्या माध्यमातून प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरवात मुंबईचा कायापालट या माध्यमातून करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी आभार मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -