Sunday, July 21, 2024

वनभोजन

शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये वर्षामध्ये एकदा वनभोजन आयोजित केले जाते. त्यामुळे निसर्गाची ओळख विद्यार्थ्यांना होते. याचा परिणाम जंगलातील झाडे विविध औषधी वनस्पती यांची ओळख झाल्याने नैसर्गिक संपत्तीची आपण काळजी घेतली पाहिजे. निसर्गामुळेच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो, याची जाणीव निर्माण होते. हे वनभोजनामुळे शक्य झाले आहे. यासाठी प्रत्येक वर्षी शाळेच्या वतीने एक दिवसाचे वनभोजन आयोजित करण्यात यावे. ते सुद्धा निसर्गरम्य अशा परिसरात.

सध्याच्या काळात मोबाइलच्या दुनियेत वावरणाऱ्या आजच्या मुलांना वनभोजनाची मजा कशी समजणार? सध्या सहली जातात त्यासुद्धा गाडी चालू असताना बंदिस्त गाडीमधून पारदर्शक काचेतून बाहेरचे जग बघायचे. मग सांगा निसर्गाची खरी ओळख कशी होणार? निसर्गाची ओळख करायची असेल, तर वनात पायपीट केली पाहिजे. कानाने झुळझुळणारा आवाज एकायला हवा. उन्हातून चालायला हवे. अंगामध्ये घाम यायला हवा. मोकळा श्वास घ्यायला पाहिजे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात गेल्याचा आनंद मिळेल. हे फक्त वनभोजनामुळे शक्य असते. कारण वनभोजनाची मजा काही न्यारीच असते. विद्यार्थ्यांना खरा अनुभव हा वनभोजनातून मिळतो. प्रत्यक्ष आपण निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखे वाटते. त्यात जंगलातील जमिनीवर बसून जेवणाची मजा काही वेगळीच असते.

प्राथमिक शाळांमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत शाळेपासून जवळच असलेल्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, ज्या ठिकाणी पाण्याचा आसरा आहे, अशा ठिकाणी वनभोजन आयोजित केले जाते. यामध्ये गावचे चार-पाच इसम जेवण करण्यासाठी घेऊन जातात. मी कणकवली तालुक्यातील माझ्या आयनल गावच्या पूर्ण प्राथमिक शाळा आयनल गावठाण या शाळेमध्ये असताना वनभोजनाला जात असे. हिवाळ्यात थंडीची चाहूल लागली की, वनभोजनाची लगबग सुरू होते. नंतर दुसऱ्या दिवशी सुट्टीचा दिवस धरून वनभोजनाची तारीख ठरवली जायची. त्यानंतर एक पेला तांदूळ, एक वाटी डाळ येताना घेऊन यायचे असे ठरायचे. त्यानंतर प्रत्येकी पन्नास पैसे किवा एक रुपया काढायचा. त्यामधून बटाटे, कांदे, मसाला व आवश्यक जेवणाचे साहित्य घ्यायचे. वनभोजनाच्या दिवशी येताना एक पिशवी त्यात ताट, तांब्या व पेला घेऊन यायचे. वनभोजनाला नेहमी कदम गुरुजींचा पुढाकार असायचा. त्यांच्या जोडीला पडवळ गुरुजी असायचे. शाळेतील कदम गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वनभोजन आयोजित केले जायचे. तशी त्यांना गावची सर्व माहिती होती. तसा त्यांचा दराराही मोठा होता. एकदा आमचे वनभोजन ठरले की, ठिकाण असायचे, आडये बार्येतील साळकारांच्या राटाच्या बरोबर समोर असलेल्या गवळद्याजवळ. गवळद्याचे झाडपण मोठे झिपारलेले होते. त्यामुळे मंडप बांधण्याचे मुळीच कारण नाही. अगदी वाटेच्या बाजूला. समोर कोपरे त्यात आम्ही गेल्या गेल्या थोडा वेळ क्रिकेट खेळायचो. नंतर साफसफाई करायचो. वनभोजनाला जाताना सर्वजण सकाळी साडेसात वाजता शाळेच्या आवारात जमायचो. त्यावेळी शाळेत मुलांना गणवेश नव्हता. जे असतील ते कपडे घालून येत असत. वनभोजनाच्या दिवशी उंचीप्रमाणे एका लाइनीत मुलांना उभे करायचे. पहिली लहान मुले नंतर मोठी. एकामध्ये किमान एका फुटाचे अंतर, असे लाइनीत वनभोजनाच्या ठिकाणी जायचो. तीसुद्धा गाणी म्हणत. वाटेच्या जवळ काम करणारी माणसे पण उभी राहून आमचे कौतुक करायची. नंतर म्हणायची, ‘पोरांनू सांभाळून जावा आणि येवा. आमका तेवडा बरा वाटायचा.’ जेवण करायला गावातील तरबेज साटम व घाडीगावकर मंडळी असायची.

गेल्यानंतर एका लाइनीत प्रत्येकाची पिशवी ठेवायची आणि आम्ही खेळायला कोपऱ्यात जायचो. गावकरी मंडली त्या ठिकाणी असलेल्या दगडाची चूल तयार करायचे. त्यानंतर गुरुजींनी हाक दिल्यावर आम्ही सर्वजण एकत्र यायचो. नंतर ठरल्याप्रमाणे जवळपासची सुकी लाकडे जमा करणे, काहीजन साळकारांच्या विहिरीवर जाऊन पाणी हाणायचे, नंतर आसपासचा परिसर साफ करायचा. तोपर्यंत जेवण व्हायचे. त्यानंतर जेवणाची पूर्ण गोलाकार आकाराची पंगत बसायची. जेवण झाल्यावर आपापले सामान आपल्या पिशवीत भरून ठेवायचे त्यानंतर भेंड्या लावायच्या, भावगीते म्हणायचो, गावातील काही मुले अभंग म्हणायचे, नंतर कदम गुरुजी जवळपास असणाऱ्या झाडांची माहिती सांगायचे. यात दिवस कधी मावळतीला जायचा, हे समजायचे सुद्धा नाही. मात्र दिवस मावळण्या आधी शाळेत येऊन आपापल्या घरी जायचो. असा हा पुस्तकाच्या ओझ्याविना एक दिवस वनभोजनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मोकळा श्वास घेतल्याचा आम्हा सर्वांना आनंद होत असे.

आता मात्र राहिल्या त्या बालपणीच्या शालेय जीवनातील आठवणी. तेव्हा आता जरी वनभोजनाला गेलो तरी शालेय जीवनातील मजा आता नाय यायची.

-रवींद्र तांबे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -