वसई (वार्ताहर) : सध्या पालघर किनाऱ्यावरील मच्छीबांधव अनेक कारणामुळे त्रस्त आहे. (Dry Fish) एकीकडे येथील वाडवण बंदरामुळे भविष्यातील मासेमारी धोक्यात आली असताना, भरपूर मिळणारे चविष्ट पापलेट दुर्मिळ होत चालले आहेत. अशातच सुकी मासळी (Dry Fish) बाजारात दाखल झाली असली तरी अनेक कारणांमुळे तिचे दर वाढले आहेत. या महागाईचा फटका सुकी मासळीला बसला असतन तिला उठाव नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात सातपाटी, डहाणू, अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर यासह विविध भागांतील समुद्र किनाऱ्यांवर सुक्या मासळीचा मोठा व्यापार चालतो. हे सुकवलेले मासे चार ते पाच महिने टिकतात. हे मासे व्यवस्थितरीत्या सुकवल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणले जातात. आदिवासीबहुल क्षेत्रात सुक्या मासळीला अधिक मागणी असते. चवीला उत्तम असलेली सुकी मासळी साठवणूक करून ठेवली जाते. हिवाळ्यात सुकवून ठेवलेल्या मच्छीचा दर्जा उत्तम असतो.
त्यामुळे मंडई, आठवडी बाजार, शहरात भरणारे बाजार आदी ठिकाणी मांदेली, करंदी, बोंबील, वाकटी, पाखट, बांगडा, दाडा, जवळा, सुकट आदी प्रकारची सुकी मासळी दिसून येते, पण लांबलेल्या पावसामुळे काही ठिकाणी सुकवत ठेवलेल्या मासळीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ही मासळीदेखील कमी प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारभाव वाढला आहे.
मच्छीमारांची तारेवरची कसरत
पालघर जिल्ह्यात पापलेटला चांगली मागणी असते. हॉटेल, उपाहारगृह, रिसॉर्ट मालाकांसह खवय्ये पापलेट खरेदीसाठी गर्दी करतात, परंतु यंदा चविष्ट दालदा फिशिंग पापलेटची ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळे आवक कमी झाली आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. मच्छीमार बांधवांना नवीन बोट खरेदीसाठी येणार खर्च, बोटी देखभाल-दुरुस्ती, कर्जाचे हप्ते, खलाशांचे वेतन व घरखर्च याचा ताळमेळ मिळणाऱ्या उत्पन्नातून बसवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
उत्पन्नात घट
पालघर जिल्ह्यात सुकी मासळी घेण्यासाठी नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर यासह अन्य परिसरातून खरेदीसाठी व्यापारी येतात. एका गोणीत ४० किलो; तर एका ट्रकमध्ये सहा टन मासळी नेली जाते. यामुळे मच्छीमार बांधवांना फायदा होतो, परंतु यंदा मासळीचे प्रमाण कमी झाल्याने यंदा उत्पन्नात मोठी घट होणार आहे.
सुक्या मासळीचे दर
सुकट – २४० रुपये किलो
बोंबील – ३४० रुपये शेकडा
वाकटी – ४५० ते ५०० रुपये ५० नग
मांदेली – २६० रुपये किलो
करंदी – २०० ते २५०