Sunday, August 31, 2025

Shraddha Walker Murder Case : अशी वेळ कोणावरही येऊ नये; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटल्यानंतर माध्यमांसमोर बोलले!

Shraddha Walker Murder Case : अशी वेळ कोणावरही येऊ नये; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटल्यानंतर माध्यमांसमोर बोलले!

मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walker Murder Case) देशभरात एकच खळबळ उडाली. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. या भेटीत तुम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विकास वालकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच आफताब पूनावाला याने माझ्या मुलीची हत्या केली. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, तसचे त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी केली.

प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. हे तुकडे त्याने एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरातल्या जंगलात फेकले होते. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत असून, दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

यातच पोलिस आरोपी आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. मात्र, अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस काही लागले नसल्याचे सांगितले जात आहे. नार्को टेस्टनंतर आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना असा कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. जेणेकरून हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. आफताबच्या चलाखीमुळे पोलिसांच्या हाती काही लागत नसून, पोलीस पुराव्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिसांनी आफताबची आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये १० दिवस कसून चौकशी केली.

दरम्यान, दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांचे काम व्यवस्थित सुरु आहे. वसई पोलिसांनी सहकार्य केले नाही. त्यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच कारवाई केली असती, तर आज माझी मुलगी जिवंत असती. वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला, असे विकास वालकर म्हणाले. माझ्या मुलीसोबत जे झाले, असे कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचे आणि त्यासाठी १८ वर्षांनंतर मुलींना स्वातंत्र्य दिले जाते, त्यावर विचार व्हावा, अशी मागणी देखील विकास वालकर यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >