बेळगाव : कर्नाटकातून महाराष्ट्रात बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border) चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली.
ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. कोल्हापूर बायपासमार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना होणार आहे. “आता वातावरण निवळले आहे,” असे प्रवाशांचे म्हणणे आहे. “तर मराठी आणि कन्नड काही वाद नाही. हा वाद राजकीयदृष्ट्या घडवून आणलेला आहे,” अशी प्रतिक्रिया बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली. या वादामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे आणखी एका प्रवाशाने म्हटले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने त्याला महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे. यानंतर कर्नाटकच्या बसला दौंड इथे शाई फासण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती.
सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली.