
लंडन (वृत्तसंस्था) : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटसाठी यंदाचे वर्ष विशेष ठरले आहे. जो रुटने (Joe Root) २०२२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
वर्ष २०२२ मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार फलंदाज जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये एका वेगळ्याच लयीत दिसला आहे. यावर्षी त्याच्या बॅटमधून एकूण ५ शतके आणि दोन अर्धशतके झळकली आहेत. यामध्ये १७६ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. रुटने २०२२ मध्ये १३ सामन्यांच्या २४ डावांमध्ये ५०.९० च्या सरासरीने १०६९ धावा केल्या आहेत.
या क्रमवारीत इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षात बेअरस्टोने आतापर्यंत १० सामन्यांच्या १९ डावांमध्ये ६६.३१च्या सरासरीने १०६१ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १६२ आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ९ कसोटी सामन्यांच्या १६ डावांत ८५.८०च्या सरासरीने १०२१ धावा केल्या आहेत. पहिल्या पाचही फलंदाजांमध्ये ही सरासरी सर्वाधिक आहे. यादरम्यान त्याने ४ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १६० धावा आहे.