महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात सोनं असल्याचे म्हटलं आणि मग महाराष्ट्रभर याची चर्चा सुरू झाली. कोकणात सोनं असलं तर त्यात काय विशेष. परमेश्वराने निसर्गाच्या रूपात कोकणाला भरभरून सर्वकाही दिलं आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने कोकणावर उधळण केली आहे. अनेक प्रकारची स्वादिष्ट फळं दिली आहेत. तरीही आपण आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करत राहातो. हा आपला स्वभावगुण झाला. सिंधुदुर्गातील भूगर्भात सोनं आहे असा अहवाल पन्नास वर्षांपूर्वी भूगर्भतज्ज्ञांनी दिला होता; परंतु कोकणात सोनं असू दे किंवा आणखी काही त्याचा कोकणाला किती उपयोग करून घेता येईल हे सांगण आणि ठरवणं मुश्कील आहे. याचे कारण कोकणात कधीही कुठलं काही चांगलं घडायचं झालं तर शंभर शंका-कुशंका घेतल्या जातात. या शंकांमध्येच सार गडप होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांत भूर्गभात सोन्याचा साठा असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केल्याने साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तर नवल. सिंधुदुर्गातील भूगर्भात मॅगनिज सापडले होते. या मॅगनिजला मोठा दरही आला होता; परंतु नंतरच्या काळात अन्य देशातही मॅगनिजचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडल्याने कोकणातील मॅगनिजचा विषय मागे पडला. कोकणातील भूगर्भात नेमक काय-काय दडलंय हे भूगर्भशास्त्रज्ञच जाणोत.
आता फक्त कोकणातील या सोन्याच्या गजाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात साठ वर्षांपूर्वीच्या काँग्रेसी सत्ताकाळात कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची भाषणं व्हायची. कॅलिफोर्निया कसा असेल असा प्रश्न माझ्या पिढीच्या सर्वांनाच त्याकाळी पडलेला. किमान ३०-४० वर्षे तरी कॅलिफोर्नियाचे गाजर जनतेच्या तोंडी होते. कोकणातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कॅलिफोर्नियाने पछाडलेले होते. सर्वजण कॅलिफोर्नियाचे स्वप्न रंगवत असायचे. विकासाची जेव्हा जेव्हा त्या काळी चर्चा व्हायची तेव्हा तेव्हा हा कॅलिफोर्नियाचा विषय समोर असायचा. कोकणचा विकास म्हटला की, कॅलिफोर्नियासमोर आलाच समजायचा. त्याच काळात कोकणात सोन्याची खाण कशी आहे याचीही चर्चा व्हायची. कोकणातील मातीत सोनं आहे. एकदा का सोनं सापडल की मग कोकणी माणूस कसाच कुणाला ऐकणार नाही. याच्या गजाली गावोगावी रंगत होत्या. आता त्यावर चर्चा होताना दिसते. आताची तरुण पिढी त्याची विज्ञानपातळीवर विचार आणि चर्चा करताना दिसतात. अर्थात पन्नास वर्षांपूर्वी किंवा गेल्या पन्नास वर्षांत काय घडलं यापेक्षा याच्या पुढच्या काळात काय घडणार आहे ही बाब अधिक महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोन्याचा विषय जाहीर केल्यानंतर त्यावर दोन्ही बाजूने चर्चा आणि भाष्य करणे साहजिकच होतं. जशी या भूगर्भातील सोन्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली तशी ती कोकणातही होऊ लागली नसेल तरच नवल. यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा इतकीच आहे की, ज्या विषयाची चर्चा मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे, त्या चर्चेप्रमाणे यातील कार्यवाही झाली पाहिजे. त्यातून कोकणाचं भलं होणार असेल तर ते झालं पाहिजे किंवा कोकणातील भूगर्भात असलेल्या खनिजाची माहितीही उघड झाली पाहिजे. त्याचं उत्खनन होऊन ते लोकांसमोर यायला हवे. महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत या सर्वच बाबतीत अनास्थाच दाखवली आहे. कोकणातील पर्यटन विकासाच्या बाबतीतही आजवर शासनकर्ते उदासीनच राहिले आहेत. पर्यटनासारख्या व्यावसायातून आर्थिक समृद्धी येऊ शकते; परंतु कोकणात पर्यटनाला प्रचंड प्रमाणात वाव असताना त्यादृष्टीने कधीच विचार करण्यात आला नाही. पर्यटन व्यवसाय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असतानाही आजवर त्याकडे डोळेझाकच करण्यात आली आहे. शासनाकडे कोकणातील पर्यटनस्थळांचा विकास आणि मूलभूत सोईसुविधा याकडे कधीच लक्ष दिलं गेलं नाही. शेकडो कोटींची उलाढाल या पर्यटन व्यवसायातून होणारी असताना त्याचे कोणतेही नियोजन सरकारपाशी नाही.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनाही कोकणातील पर्यटनस्थळांची भुरळ पडली आहे. म्हणूनच हजारो पर्यटक गोव्याच्या सीमेवरील पर्यटन स्थळांमध्ये येत होते. पर्यटनाचा हा मुद्दा दुर्लक्ष करण्याचा नाही. यासाठी शासनाने खरंतर वेगळे निकष केले पाहिजेत; परंतु कोकणाला काही द्यायचं झालं तर सत्तेवर असणाऱ्या कुणाचीच कधीही उदारता दिसलेली नाही. राज्यात सत्ता कुणाचीही-कोणत्याही पक्षाची असली तरीही पश्चिम महाराष्ट्राची राजकीय लॉबी कुणालाही काही देऊ देत नाही. उर्वरित महाराष्ट्रात काही दिलं जाणार असेल, तर त्यात फार नियोजन पद्धतीने आडव आणून विकासात पाठिंब्याऐवजी थांबवण्याचं काम पश्चिम महाराष्ट्र लॉबीकडून केलं जातं. म्हणूनच गेल्या काही वर्षांत शेकडो कोटी रुपये हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी देण्यात आले. महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जो दिलदारपणा, जी उदारता दाखवली गेली ही उदारता कधीच दिसली नाही. महाराष्ट्रातील ज्या भागात जे आहे ते शोधून त्याचा विकास केला गेला पाहिजे. नाहीतर मालवणी मुलखात एक म्हण प्रचलित आहे. ‘लंकेक सोन्याच्यो विटो आमका त्येचो काय उपयोग? तर असं काही याबाबतीत घडू नये. सिंधुदुर्गाच्या भूगर्भातील सोन्याचा विषयाच्या चर्चेला प्रारंभ झालाच आहे, तर चांगलं काही घडावं ही अपेक्षा!
-संतोष वायंगणकर