Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीSanjay Raut :...तर संजय राऊतांना फटकवणार

Sanjay Raut :…तर संजय राऊतांना फटकवणार

शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

मुंबई : महाराष्ट्राच्या सरकारला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी षंड असे संबोधल्याच्या मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी जर अशी विधाने थांबवली नाहीत तर आमची दोन हात करण्याचीही तयारी आहे, असा उघड इशारा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र सरकारबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीरपणे धिक्कार करतो, असे म्हणत शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

जशास तसे उत्तर देणार

“छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली जी तुकडी बेळगावला गेली होती. त्यात एकनाथ शिंदे देखील होते. ४० दिवस त्यांना तुरुंगात राहावे लागले होते. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या होत्या. त्यामुळे सीमावादावरुन चार तासही तुरुंगात न राहिलेल्या राऊतांना एकनाथ शिंदेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. संजय राऊतांनी यापुढे बडबड जर बंद केली नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत वेडेवाकडे बोलणे थांबवले नाही तर जशास तसे उत्तर शिंदे साहेबांचे सैनिक दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर बोलणे थांबवावे, आमची मंत्रीपदं, नेतेपद राहिली बाजूला पण शिंदे साहेबांबद्दल पुन्हा खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊत बोलले तर त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची पण तयारी आहे”, असे शंभूराज देसाई म्हणाले.

संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावे

“सीमावादावर केंद्राने लक्ष द्यावे. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी करत आहेत. असे असताना षंड हा शब्द संजय राऊत यांनी आमच्या सरकारवर आणि आमच्यासाठी वापरला. संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावे. कारण ज्यांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे समन्स कर्नाटकच्या कोर्टाने धाडले ते सुद्धा पूर्ण करण्याचे धाडस राऊतांकडे नाही. न्यायालयाचे कवच असताना सुद्धा ते तिथे जात नाहीत, अशांनी आम्हाला षंड बोलू नये”, असे शंभूराज देसाई म्हणाले.

“संजय राऊत तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. तुम्हाला बाहेरचे वातावरण सूट होत नाहीत. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे अशी वक्तव्य टाळावीत”, अशा शब्दात शंभूराज देसाईंनी राऊत यांना इशारा दिला आहे.

आमच्यामुळे संजय राऊत खासदार

“एकनाथ शिंदेंच्या एका शब्दामुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आम्ही जर शिंदे साहेबांचे ऐकले नसते तर संजय राऊतांच्या नावापुढे आज माजी खासदार असे असते. आमच्या ५० आमदारांच्या मतावर संजय राऊत खासदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिंदे साहेबांनी चांगुलपणा दाखवला म्हणून ते खासदारपदी राहिले आहेत”, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -