विरार (प्रतिनिधी) : वसई-विरारमधील (Vasai-Virar) जलतरणपटूंसह एकूण सहा जलतरणपटू जलतरणातील जागतिक विक्रमासाठी सज्ज झाले आहेत. हे सहा जलतरणपटू गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते डोना पॉला (गोवा) आणि परत वसई किल्ल्यापर्यंत एकूण ११०० किलोमीटरचे अंतर पोहून पूर्ण करणार आहेत.
या मोहिमेची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून १० डिसेंबरला सकाळी होणार असून १५ दिवसांत हे लक्ष्य पूर्ण करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम होणार आहे. यापूर्वी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, यू.एस.ए. येथे २०१९ मध्ये ९५९ किमीचा सध्याचा जागतिक विक्रम आहे. हा विक्रम मोडण्याचा मानस या सहा जलतरणपटूंचा आहे.
हे सर्व सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहेत. या जलतरणपटूंमध्ये कार्तिक संजय गुगले (२० वर्षे), राकेश रवींद्र कदम (२४ वर्षे), संपना रमेश शेलार (२१ वर्षे), जिया राय (१४ वर्षे), दुर्वेन विजय नाईक (१७ वर्षे), राज संतोष पाटील (१७ वर्षे) यांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि पोर्ट गोवाची परवानगी घेण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाकडून एनओसी घेतली आहे. सुरक्षिततेसाठी आणि मोहीम वेळेवर पूर्ण करण्यासाठी पुरेशा संख्येने सेफ्टी बोटी आणि लाइफ गार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे.