Saturday, October 18, 2025
Happy Diwali

MH-KA border : सीमाभागात बससेवा ठप्प; प्रवाशांवर मोठा परिणाम

MH-KA border : सीमाभागात बससेवा ठप्प; प्रवाशांवर मोठा परिणाम

बेळगाव (प्रतिनिधी) : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्र-कर्नाटक वाद (MH-KA border) दिवसेंदिवस आता वाढतच चालला असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बस पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत.

तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांवर, प्रवाशांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

मंगळवारी कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय संघटनांनीही जशास तसे उत्तर देत कर्नाटकातील वाहनांना काळे फासले होते. त्यामुळे आता हा वाद प्रचंड वाढला असून आता दोन्ही राज्यातील बससेवेवर याचा परिणाम झाला आहे. वाहनांच्या तोडफोडीनंतर आता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिंमत असेल तर बेळगावमध्ये येऊन दाखवा असा इशारा महाराष्ट्रातील राजकारण्यांना दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या समस्यांसाठी बेळगाव, निपाणी या शहरांचा आधार आहे. मात्र आता बससेवा बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा मिळणेही अवघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चालू झालेला हा सीमावाद आता कधी मिटणार, असा सवाल सीमाभागातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. कर्नाटक सीमेजवळील या वादाची तीव्रता अधिक जाणवते आहे. सोलापुरात ही वाद पेटला असून सोलापुरात आलेल्या कर्नाटकच्या बसेस अडवून काळे फासले जात आहे. सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक झाली असून कर्नाटक सरकारच्या बसेस किंवा अन्य वाहने आल्यास ती फोडण्यात येतील, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >