
मल्लिकार्जुन खर्गे हे आता केवळ काँग्रेसचे नेते नाहीत, केवळ खासदार नाहीत किंवा केवळ राज्यसभेतील विरोधी पक्षनेते नाहीत, तर अखिल भारतीय काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. संघटनात्मक निवडणुकीत ते शशी थरूर यांचा पराभव करून निवडून आले आहेत. ते जरी गांधी परिवाराशी निकटवर्तीय असले तरी त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत सोनिया गांधींसारखी बोलताना चूक करायला नको होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी निवडणूक प्रचारात थेट रावण म्हणून संबोधले. आपण अनवधानाने बोललो असेही त्यांना वाटले नाही. आपण चुकीचे बोललो असे ते म्हणत नाहीत. उलट आपल्या बोलण्याचा भाजपने चुकीचा अर्थ काढला व गैरप्रचार केला असे खर्गे सांगत आहेत.
निवडणूक प्रचारात खर्गे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना रावणाप्रमाणे १०० तोंडे असतील, ज्यामुळे ते निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वत्र जाण्याचा प्रयत्न करीत असतात. मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. आपले कर्तव्य विसरून ते महापालिकेच्या निवडणुका, आमदारकीच्या निवडणुका, खासदारकीच्या निवडणुका अशा सर्वच ठिकाणी प्रचार करीत फिरतात. प्रत्येक वेळी स्वत:बद्दलच बोलत असतात. तुम्हाला कुणाकडे बघण्याची गरज नाही, फक्त मोदींना बघा व मते द्या, असे ते सांगत असतात. ही त्यांची रणनिती आहे. पण आपण त्यांचाच चेहरा किती वेळा पाहायचा? त्यांची नेमकी रूपे किती आहेत? त्यांना रावणासारखी शंभर तोंडे आहेत का? काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी रावण म्हटल्यावर मोदीजींनी काय गप्प बसायचे का? भाजपने तर मोदींचा अपमान म्हणजे गुजरातचा अवमान असा प्रचार धुमधडाक्यात सुरू केला. गुजरातच्या अस्मितेवर काँग्रेसने घाला घातला, असा आरोप भाजपने केला. खर्गे यांनी मोदींना रावण म्हटल्यावर मोदींनी खर्गेंना सडेतोड प्रत्युत्तर तर दिलेच पण अन्य काँग्रेस नेत्यांचीही जाहीर सभेत धुलाई केली. मोदी म्हणाले, मला शिव्या देण्यासाठी काँग्रेस पक्षात चढाओढ लागली आहे. एक नेता म्हणतो, मोदी कुत्र्यासारखे मरतील. दुसरा नेता म्हणतो, मोदी हिटलरसारखे मरतील. ते मला रावण, राक्षस, झुरळ म्हणतात. त्यांनी माझ्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्यातून कमळच उगवणार आहे…. सोनिया गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी ‘मौत का सौदागर’ अशी मोदींवर टीका केली होती.
गुजरातचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी यावेळी तुमची औकात दाखवून देतो अशी धमकीच मोदींना दिली. त्यानंतर पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना रावण म्हणून संबोधले.… मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. काँग्रेस हा गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसच्या अध्यक्षानेच नव्हे तर कोणाही नेत्याने पातळी सोडून देशाच्या पंतप्रधानांवर अशी बेलगाम टीका करणे चुकीचे आहे. त्यामुळे काँग्रेसला लाभ तर काही होत नाहीच. पण काँग्रेसचे अधिक नुकसानच होते. हा आजवरचा अनुभव आहे. गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेसचे नेते मोदींवर वैयक्तिक हल्ले चढवतात, पण मोदींनी धारदार भाषेत परतफेड करायला सुरुवात केली की मग त्यांची पळताभुई थोडी होते हे सर्व देशाने बघितले आहे…. काँग्रेसचे नेते जी (शाब्दिक) दगडफेक करतात, तेच दगड हातात घेऊन मोदी त्यांच्यावर भिरकावयाला लागले की, त्यांना लपायलाही जागा सापडत नाही. सार्वजनिक जीवनात विशेषत: राजकारणात वागण्या-बोलण्यातून चुका होत असतात. पण एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये, याची दक्षता घ्यावी लागते. पण काँग्रेसचे नेते झालेल्या चुका पुन्हा पुन्हा करीत आहेत व काँग्रेससाठी ते निसरडा रस्ता बनवत आहेत.
निवडणूक प्रचारात मल्लिकार्जुन खर्गे हे कोणत्या जोशात मोदींना रावण म्हणाले हे त्यांनाच ठाऊक. पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या खर्गे यांचा तोल कसा गेला? सन २००७ मध्ये सोनिया गांधी यांनी मोदींवर मौत का सौदागर अशी टीका केली केली होती.
सोनिया गांधींनी केलेल्या टीकेला देशभर प्रसिद्धी मिळाली. पण काँग्रेस पक्षाला त्याचा किती फायदा झाला? कोणत्याही निवडणुकीत मोदी स्वत: भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरतात, भाजपचे सारे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होतात, ही वस्तुस्थिती आहे आणि विरोधकांची डोकेदुखी आहे. पक्षाची केडर भाजपमध्ये जेवढी मजबूत आहे तशी अन्य कोणत्याही पक्षात नाही, पण प्रत्येक निवडणुकीत भाजप सर्वस्व पणाला लावते म्हणून काँग्रेस व अन्य पक्ष टीकाच करीत बसतात. मोदींची चहावाला म्हणून काँग्रेसने भरपूर टिंगल केली. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते व स्वातंत्र्यवीर सावरकरद्वेष्टे मणिशंकर अय्यर यांनी मोदींनी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर चहा विकायला बसावे अशी ऑफर दिली होती. आपल्याला काँग्रेसचे नेते चहावाला म्हणून हिणवतात, असे मोदींनी सर्वत्र सांगायला सुरुवात केली, त्याचा फटका काँग्रेसला बसला. याच चहावाल्याच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि केंद्रात सत्ता स्थापन झाली. त्यानंतरही काँग्रेसने बोध घेतला नाही. मोदींवर शिवराळ शब्दांत टीका करणे काँग्रेसने चालू ठेवले व काँग्रेसच्या पराभवाची मालिकाही सतत चालूच राहिली. सोनिया गांधींनी मोदींवर वैयक्तिक टीका केली. पुढे काँग्रेसने गुजरातच काय पण देशाची सत्ताही गमावली. निदान राहुल गांधींनी तरी अगोदर झालेली चूक सुधारायला हवी होती. आईने केलेली चूक आपल्याकडून होऊ नये, याची दक्षता घ्यायला हवी होती.
पक्षाच्या काही वरिष्ठांनी मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करू नये असे सुचवले, पण मोदींवर वैयक्तिक हल्ले चालूच राहिले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, अशी जोरदार व धारदार टीका थेट मोदींवर केली. त्यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राहुल यांनी चौकीदार चोर है, अशी हाळी दिली. प्रियंका गांधींनीही थेट मोदींना आपल्या हल्ल्याचे लक्ष्य बनवले होते. परिणाम काय झाला, या राज्यात काँग्रेसला दोन आमदार निवडून आणताना नाकी नऊ आले. चार राज्ये काँग्रेसला गमवावी लागली. पंजाबमधेही काँग्रेसची सत्ता गेली. देशभर काँग्रेसची पिछेहाट झाली. स्वत: मल्लिकार्जुन खर्गेही पराभूत झाले. काँग्रेसकडून मोदींना दिल्या जाणाऱ्या शिव्यांची भाजपने एक यादीच बनवली आहे. २०१९ पर्यंत मोदींना दिल्या जाणाऱ्या शिव्यांची संख्या ५५ होती, नंतर गेल्या तीन वर्षांत त्यात २५ शिव्यांची भर पडली. नीच आदमी, हिटलर, कुत्ता, राक्षस अशा शब्दांची त्यात भर पडली आहे. मोदींची भविष्यवाणी सांगणे आणि त्यांना धमक्या देणे हे नवीन सुरू झाले आहे. सुबोधकांत सहाय यांनी मोदी हिटलर की मौत मरेंगे, तर शेख हुसैन यांनी मोदी कुत्ते की मौत मरेंगे अशी भविष्यवाणी केली आहे.
वाराणसीच्या पिंडरा येथील उमेदवार अजय राय यांनी तर मोदींना जमिनीत गाडण्याची धमकी दिली आहे. या सर्वांना उत्तर देताना मोदी उपरोधिकपणे म्हणतात, मी रोजच दोन-तीन किलो शिव्या खातो, बावीस वर्षे शिव्या खातो आहे…. काँग्रेसने दिलेल्या शिव्यांच्या शिडीवरून मोदी अधिक उंचावर जात आहेत. आपल्या सरकारने केलेले काम व विकास हे मुद्दे घेऊन मोदी भाजपचा प्रचार करीत आहेत. काँग्रेसचे नेते वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यात धन्यता मानत आहेत. निवडणुकीतील प्रचार असो किंवा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असो, देशातील मुस्लीम घाबरलेले आहेत, मोदी देश विकायला निघाले आहेत, धर्मनिरपेक्षता, आरएसएस, मोदी, अदानी, अंबानी या मुद्द्यांभोवतीच काँग्रेस गेली आठ वर्षे गोल गोल फिरत आहे. राजकारणाची बदललेली दिशा, देशातील तरुणाईची बदललेली मानसिकता ही काँग्रेसच्या लक्षात येत नाही हीच पक्षाची मोठी कमतरता आहे.
-डॉ. सुकृत खांडेकर