नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (repo rate) आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे (एमपीसी) निर्णय जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समितीचे चलनविषयक धोरण जाहीर केले. यावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर ६.२५ टक्के झाला आहे.
शक्तिकांत दास यांनी सांगितले की एमपीसीच्या ६ पैकी ५ सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर आरबीआयने रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.
गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “आम्ही आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या शेवटी आलो आहोत आणि केवळ देशातच नाही तर जगातील अनेक देशांनी महागाईचा दर वाढलेला पाहिला आहे. जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळी परिस्थिती आव्हानांना तोंड देत आहे. चलनवाढीचा दर वरच्या स्तरावर असताना बँक पत वाढ सध्या दुहेरी अंकांच्या वर येत आहे.”