
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Raj Bhavan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा कोश्यारी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कधी कोणत्या गोष्टीवरून वाद निर्माण होईल, हे काही सांगता येत नाही. राजभवनात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या अभिनेत्रीने थेट राज्यपालांच्या रिकाम्या खुर्चीसमोर फोटोशूट केले. ते फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केल्याने एका नवीन वादाला तोंड फुटले.
या मॉ़डेलचे राजभवनातले फोटो समोर आले असून त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.
https://twitter.com/ManojBChavan5/status/1600329002937221120मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, "ठिकाण राजभवन - ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?" या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या खुर्चीसोबत मायराने काढलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर राजभवनाने नाराजी व्यक्त केली. राज्यपालांच्या दालनात त्यांच्या अनुपस्थितीत महिलांनी फोटो काढल्यानं त्यांना योग्य ती समज दिली गेली. खरंतर राज्यपालांच्या भेटीआधी मोबाईल बाहेर ठेवण्याचा नियम असताना मोबाईलवरून फोटो काढल्यानं राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा वागण्याने राजभवनाची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दलही अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली.