Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीBhagat Singh Koshyari : देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान महत्त्वाचे

Bhagat Singh Koshyari : देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान महत्त्वाचे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई (वार्ताहर) : सन १९६५ साली भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केल्यावर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला होता. (Bhagat Singh Koshyari) आज अनेक दशकांनंतर देखील भारतीयांमध्ये संरक्षण दलांप्रती अतिशय आदराची भावना आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे सैन्य दलातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, जखमी झालेले जवान यांच्या कल्याणासाठी विविध संस्थांनी कर्तव्य भावनेने अधिकाधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी राजभवन येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यपालांच्या जॅकेटला सशस्त्र सेनेच्या ध्वजाचे तिकीट लावण्यात आले व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

महाराष्ट्राप्रमाणेच उत्तराखंड राज्यात देखील सशस्त्र सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याची मोठी परंपरा आहे. आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्याने देखील तरुण वयात देशासाठी बलिदान दिले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सर्व हुतात्म्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते असे सांगून राज्यपालांनी ध्वज निधीला योगदान देणाऱ्या संस्था, सार्वजनिक उपक्रम व शासकीय कार्यालयांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी ले.जन. एच.एस. कहलों, नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य अधिकारी व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एअर ऑफीसर कमाडींग हेडक्वाटर, मरिटाईम एअर ऑपरेशन रजत मोहन, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश पाटील तसेच ध्वज निधीला योगदान देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -