मुंबई : कोकणातील रिफायनरी (Refinery) प्रकल्पांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. या लोकांना कोकण मागास ठेऊन, लोकांच्या भावना भडकवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे, असा गंभीर आरोप केला.
यावेळी फडणवीसांनी कोकणात रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाही, अशी टीका होत असल्याचे सांगत त्यांना प्रत्युत्तर दिले. फडणवीस पुढे म्हणाले की, “खरंतर आज देशातील सर्वात महत्त्वाची रिफायनरी गुजरातमध्ये आहे. ती रिफायनरी जामनगरमध्ये असून रिलायन्सची आहे. त्या रिफायनरी परिसरातूनच कोकणाच्या खालोखाल सगळ्यात जास्त आंबा निर्यात होतो. हा आंबा जगभरात जातो. त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नको आहे.”
“आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे कोकणात आम्ही रिफायनरी करूनच दाखवू. कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू. त्याचवेळी कोकणाचे पर्यावरण आहे त्यापेक्षा चांगलं करून दाखवू, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे,” असेही फडणवीसांनी नमूद केले.