Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक उत्तुंग, प्रखर बुद्धिवान, समाजउद्धारक, बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचा महामानव!! या अतिविशाल व्यक्तिमत्त्वाचे समग्र पैलू एकाच लेखात दर्शवणं केवळ अशक्य!! म्हणून या लेखात ‘अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या एकाच पैलूवर विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

समता शिक्षण आणि संघटन मंत्र असे आपुला ।।
ज्ञानसूर्य वंदनीय आपण ज्ञानाचा सागर दिधला।। १।।
देशासाठी संविधान अर्पण।
घटनेचे शिल्पकार आपण।
भारतीय न्यायशास्त्र वदिला।। २।।
बहुज्ञानी बहुभाषिक।
कर्तव्यतत्पर पुरुषोत्तम आपण।।
ज्ञानाचा मंत्र अर्पिला ।। ३।।
तेजस्वी ध्येयाधिष्टित। लोकप्रिय चिरंतन आपण।
‘भारतरत्न’ तुम्हां अर्पिला।।४।।

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर देशभरातून जनसागर येतो, तो या महामानवाला अभिवादन करण्यासाठी…! प्रतिवर्षी चैत्यभूमीवर दिसणारा उत्साह यंदाही दिसेल.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती।
तेथे माझे कर जुळती।

भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजनितिज्ञ आणि समाजसुधारक होते. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय संविधानातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे म्हटले जाते. डॉ. आंबेडकर आणि तासनतास अखंड अभ्यास, असे समीकरण आहे. सलग अठरा अठरा तास अभ्यास करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांच्या जीवनातील एक प्रसंग अत्यंत लक्षवेधी आहे. एका रात्री डॉ. बाबासाहेब वाचन करत बसले होते, त्यांनी घरातल्या कर्मचाऱ्याला सांगितले की, ‘उद्या सकाळी लवकर ये.’ दुसऱ्या दिवशी सकाळी तो कर्मचारी घरी आला. पाच मिनिटे झाली तरी बाबासाहेबांचं आपल्याकडे लक्ष गेलं नाही म्हणून त्याने टेबलावरील दोन पुस्तके हलवली. त्यावर बाबासाहेब वर पाहत म्हणाले, ‘तू अजून घरी गेला नाहीस?’ त्यावेळी तो कर्मचारी म्हणाला, ‘मी मध्यरात्री घरी जाऊन आता परत सकाळी आलो आहे!’ रात्री वाचायला, लिहायला बसलेल्या बाबासाहेबांना दुसरा दिवस उजाडला हेही माहीत नव्हते. इतके ते त्या त्या विषयाच्या अध्ययनात एकाग्र, मग्न होत असत. म्हणजेच त्यांच्यातील एकाग्रता, स्थिरता, प्रखर बुद्धिमत्ता आणि चिकाटी हे गुणविशेष या प्रसंगातून दिसून येतात. आज कोणालाही एकाग्रता साधता येत नाही, तर ती शोधावी लागत आहे! अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही, मनात अनेक विचार काहूर माजवत असतात, अशी विद्यार्थी वर्गाची तक्रार असते.

आपण जी गोष्ट अभ्यासत असतो, त्यात खरंच आपल्याला किती रुची आहे? यावर एकाग्रता अवलंबून असते. चित्रपट पाहताना, गेम्स खेळताना मुले इतकी त्यात गुंततात की, अवतीभवती काय चालू आहे? याचेसुद्धा त्यांना भान नसते. म्हणजे काय? तर ही एकाग्रता नसून नाद किंवा व्यसन आहे. डॉ. बाबासाहेब तासनतास अभ्यास कसा करत होते? तसे आपल्यालाही जमायला हवे, असे आधी वाटणे महत्त्वाचे आहे, तरंच त्या दृष्टीने एक एक पाऊल पडू लागते. एकाग्रतेने अभ्यास करण्याची सवय असेल, तर त्याचा उपयोग केवळ शैक्षणिक क्षेत्रात होत नाही, तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आणि हरेक वळणावर होतो. आता हेच पाहा ना, संविधान लिहिणे म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला आहे, समाजातील सर्व घटकांचा बारकाईने विचार केला आहे. शिस्त काय असते? तिचा कायद्याच्या चौकटीतून अभ्यास केला आहे. नानाविध पैलूंचा अभ्यास झाल्यावर तयार झालेले संविधान भारतीय लोकशाहीचा पाया बनले आहे. सांगण्याचे तात्पर्य हेच की, अभ्यासू वृत्ती अंगी भिनवणे आवश्यक आहे. तरच आपल्याकडूनसुद्धा डॉ. आंबेडकर यांच्या पाउलखुणांवर पाऊल ठेवले जाईल आणि ते त्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही!

६ डिसेंबर या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण सर्व भारतीय नागरिक संकल्प करूया की, डॉ. बाबासाहेबांप्रमाणेच अभ्यासक राहीन, त्यांच्या समता, समानता आणि बंधुत्व या विचारांचा आजन्म पाईक राहीन आणि त्यासाठी सतत प्रयत्नरत राहून इतरांनाही याविषयी अवगत करेन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा. तंटा न करता कायद्याच्या चौकटीत राहून वाद सोडवता येतात. पण, त्यासाठी कायद्याचा आधार घेतला पाहिजे. एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडली गेली असेल, तर तिला सनदशीरपणे विरोध करणे, त्याविषयी शांतपणे निषेध नोंदवणे असे करता येते. संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचा नागरिकांनी उपयोग केला पाहिजे. त्यासाठी समाजातील सुशिक्षित वर्गाने संविधानाचा अभ्यास करणे चालू केले पाहिजे. इंटरनेटच्या युगात विविध विषयांवरील माहिती ‘सॉफ्टकॉपी’ स्वरूपातही उपलब्ध असते. त्या सुविधेचा उपयोग केला पाहिजे. त्यामुळे उपलब्ध वेळेत मोबाइलवर संविधानाचा अभ्यास केला जाऊ शकतो.

मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा डॉ. आंबेडकर यांना अवगत होत्या. बुद्धिमान व्यक्तींना किती भाषा येत असतील? त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मातृभाषेव्यतिरिक्त अनेक भाषा बोलता येण्याचा फायदाच असतो. यामुळे लोकसंग्रह करता येतोच शिवाय विविध भाषांच्या साहित्यात आणि संस्कृतीत काय काय सांगितलेले आहे? याचाही अभ्यास करता येतो. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात खूप मेहनतीने शिक्षण घेतले आहे. यास्तवच ते विविध पदव्या प्राप्त करू शकले. अनेक

भाषा अवगत असणे, अनेक पदव्या हाती असणे त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचा आवाका किती व्यापक होता, हे लक्षात येते. केवळ एकच नव्हे, तर अनेक विषय आणि भाषा यांचे ज्ञान असलेले बुद्धिवान, व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! संस्कृत सुभाषितकार म्हणतात त्याप्रमाणे

ज्ञानंहि तेषाम्।
अधिको विशेष।

प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तेचे असणे अत्यावश्यक आहे. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाल्यावर पूर्णपणे सुशिक्षित, बहुश्रुत आणि उत्तम गुणवत्ता प्राप्त करून सुजाण, सुसंकृत नागरिक बनूनच बाहेर पडावे! समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे हे बाबासाहेबांचे ध्येय होते. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टीने सशक्त होते. व्यक्तीला चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, सत्य-असत्य यांतील भेद उमजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी बाणवण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळा म्हणजे उत्तम व कर्तव्यदक्ष नागरिक घडवणारी केंद्रे असावीत. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारे शिक्षण हेच खरे शिक्षण, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचार होते!

। ज्यांनी देशाची वाढविली शान।
। करू आज त्यांचे गुणगान।
। बाबासाहेबांना विसरू नका हो।
।। जोवर आहेत हे प्राण।।

-डॉ. वीणा खाडिलकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -