Monday, July 15, 2024
HomeकोकणरायगडE-rickshaws : माथेरानमध्ये आजपासून ई - रिक्षा सुरू

E-rickshaws : माथेरानमध्ये आजपासून ई – रिक्षा सुरू

कर्जत (वार्ताहर) : माथेरानचे टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने येथे येणारे हजारो पर्यटक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिलांची प्रचंड दमछाक होत होती. त्यामुळे सोमवार ५ डिसेंबरपासून ई – रिक्षा  (E-rickshaws) सुरू झाल्याने पर्यटकांसह माथेरानवासियांनी याचे जोरदार स्वागत केले आहे. आजच्या दिवसाची नोंद माथेरानच्या इतिहासात नोंदविली जाणार, असे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले.

माथेरान हे मुंबई व पुण्या जवळील लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी दहा लाख पर्यटक भेट देतात. परदेशी पर्यटकांनाही येथे भेट द्यायला आवडते. ब्रिटिश काळा पासून येथे वाहनांना बंदी आहे. अगदी सायकल चालवायलाही बंदी आहे. त्यामुळे घोडा व माणसाने ओढणाऱ्या हात रिक्षा यांचा वापर अंतर्गत वाहतुकीसाठी केला जातो. माथेरान प्रदूषण मुक्त रहावे यासाठी वाहनांना बंदी आहे. मात्र याचे दुष्परिणाम शंभर वर्षांपासून स्थानिक रहिवासी, पर्यटक सहन करीत आहेत.

हात रिक्षा ही एक अमानवीय प्रथा आहे. अशा प्रकारच्या रिक्षा देशातून केव्हाच हद्दपार झाल्या आहेत. दगड मातीचे व प्रचंड चड उताराचे रस्ते हा रिक्षा ओढणाऱ्या मजुरांच्या रक्ताचे पाणी करते. या रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी त्यांना देखील आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी पर्यावरण पूरक अशा ई – रिक्षांची मागणी निवृत्त शिक्षक सुनिल शिंदे यांनी श्रमिक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सुरू केली होती. दहा – बारा वर्षे ते हा न्यायालयीन लढा लढत होते. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. आणि आज माथेरानकरांचे स्वप्न सत्यात उतरले. त्यांना श्रमिक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, अनिल नाईकडे, संतोष शिंदे व रुपेश गायकवाड यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर सोमवारी ५ डिसेंबर रोजी ई – रिक्षा सेवा शुभारंभाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माथेरान नगरपरिषदेच्या प्रशासक व मुख्याधिकारी सुरेखा भणगे, मोटर वाहन निरीक्षक संदीप कित्ते, मोटर वाहन सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब कदम, माथेरानचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे, शालेय विद्यार्थी साद अब्दुल कुदुस आणि नगरपरिषद कर्मचारी तानाजी कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ई – रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत सर्वप्रथम दिव्यांग आणि शालेय विध्यार्थ्यांना प्रवास करण्याचा मान मिळाला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, मनोज खेडकर, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आदी उपस्थित होते. माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे या युद्धपातळीवर ई – रिक्षा सुरु करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत होत्या. दस्तुरी नाका, शास्त्री हॉल, कर्सनदास वाचनालय व पालिका ऑफिस येथे चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आली. तसेच ई – रिक्षा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सात पैकी पाच रिक्षा दस्तुरी नाक्यावर सज्ज झाल्या. काही तांत्रिक अडचणींमुळे दोन रिक्षांना परिवहन कार्यालयाची परवानगी मिळाली नाही. मात्र येत्या चार – पाच दिवसात तांत्रिक अडचण दूर होऊन त्या दोन्ही रिक्षा माथेरान साठी सज्ज असतील, असे सांगण्यात आले.

या ई-रिक्षाचे नियोजन नगरपालिकेतर्फे केले गेले असून सकाळी ६ ते रात्रौ १० : ३० वाजे पर्यंत ई – रिक्षा धावणार असून एकूण २६ कर्मचारी या कामी लावले आहेत. यामध्ये एकूण १६ चालक, ६ तिकीट निरीक्षक कर्मचारी आणि २ देखरेख कर्मचारी व दोन इतर कामे करणारे कर्मचारी असणार आहेत. दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड ते बाजार पेठ व पुढे विद्यार्थ्यांना सेंट झेवीयर्स शाळे पर्यंतचा मार्ग निश्चित केला आहे. ई – रिक्षाचे दर देखील निश्चित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना केवळ पाच रुपये भाडे आकारण्यात येणार असून नागरिक व पर्यटकांसाठी ३५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

‘आम्ही श्रमिक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून माथेरान मध्ये ई – रिक्षा सुरू होण्यासाठी गेली दहा – बारा वर्षे प्रयत्नशील होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. ते आमचे प्रयत्न यशस्वी झाले आणि आज ई – रिक्षा प्रत्यक्ष माथेरानच्या रस्त्यावर सेवेसाठी सुरू झाली. हे हात रिक्षा चालकांच्या दहा – बारा वर्षाच्या संघर्षाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे. हात रिक्षा चालकांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. ई – रिक्षाने पर्यटनात नक्कीच क्रांती होणार आहे.’ – सुनील शिंदे, सुप्रीम कोर्ट याचिकाकर्ते, माथेरान

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नुसार व सनियंत्रण समिती, जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी प्राप्त सूचना, आदेश आणि मार्गदर्शनाखाली नगरपरिषद माथेरान सदर प्रायोगिक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. आवश्यक सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आणि आज ई – रिक्षा स्थानिकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. स्थानिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांना सदरील सेवा प्रधान्याने देण्यात येणार आहे.’ – सुरेखा भणगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान

माझ्या घरापासून शाळेचं अंतर पाच किलोमीटर आहे. त्यामुळे पाठीवर दफ्तर घेऊन जाताना खूप दमछाक होत होती. त्यामुळे थकवा जाणवायचा पण ई-रिक्षामुळे आमचा वेळ सुद्धा वाचणार आहे. आमचे आरोग्य व्यवस्थित राहणार आहे व अभ्यास करायला वेळही मिळणार आहे. – ऋत्विक चंद्रकांत चावरे, विद्यार्थी – इयत्ता ८ वी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -