प्रभावी लसीकरणानंतर कोरोनाच्या संकटातून भारतातील जनतेची सुटका झाली, युरोप-अमेरिकेतही कोरोनाचा विळखा सुटल्यावर जनजीवन सुरळीत झाले. दोन वर्षांपूर्वी कोरोनाची सुरुवात चीनपासून झाली आणि आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने म्हणजे कोविड-१९ विषाणूंनी उचल खाल्ली आहे. चीन सरकारने निर्बंध कडक केले असून लॉकडाऊनचा फास पुन्हा आवळल्याने चीनमधील जनता संतप्त झाली आणि लक्षावधी लोक रस्त्यावर आले. बीजिंगसह तेरा प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊनला व तो लादणाऱ्या कम्युनिस्ट राजवटीला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. आम्हाला सुरळीत दैनंदिन जीवन जगू द्या, या मागणीसाठी चीनमध्ये प्रचंड संताप प्रकट झाला. लॉकडाऊन हटवा, स्वातंत्र्य द्या, या मागणीसाठी लोक हातात झेंडे फडकवून आणि व्हाइट पेपर नाचवत घोषणा देत आहेत. फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन, फ्रिडम ऑफ मूव्हमेंट ही चीनमधील जनतेची मागणी आहे.
आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, अशी मागणी करतानाच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी रेटली जाते आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. एकाच दिवसात ४० हजार बाधित झाल्याने प्रशासनाने निर्बंध कडक केले. नोव्हेंबर अखेरीस बाधितांची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली. गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे अगोदरच चिनी जनता त्रस्त होती. कम्युनिस्ट राजवटीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्यावर काय शिक्षा होऊ शकते, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण आता अति झाले…, कधी तरी हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, या भावनेतून रोज सर्व मोठ्या शहरांतून हजारो तरुण-तरुणी रस्त्यावर येत आहेत व ‘आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे’, अशी ते मागणी करीत आहेत. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात शी जिनपिंग हे चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात रस्त्यावर प्रकट होणारा प्रक्षोभ हा त्यांच्या कम्युनिस्ट राजवटीला मोठा झटका मानला जात आहे. जिनपिंग यांनी ‘झिरो कोविड पॉलिसी’ जाहीर केली. त्याचा राग लोकांना आहे. शी जिनपिंग यांच्या कोविड धोरणाविरुद्धचा संताप लोक व्यक्त करीत आहेत.
सक्तीच्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी जनता घरात बंद आहे. जीवनावश्यक व खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या खरेदीसाठीही त्यांना घराबाहेर पडता येत नाही. एका निवासी इमारतीत लागलेल्या आगीनंतर लोक कमालीचे प्रक्षुब्ध झाले, कारण लॉकडाऊनमुळे बाहेर पडणाऱ्या लोकांना तेथेच रोखले गेले. दि. २४ नोव्हेंबर २०२२, चीनमधील शिनजियांग प्रांतातील राजधानी उरूमकी येथे रात्री आठच्या सुमारास पंधराव्या मजल्यावर एका अपार्टमेंटमध्ये मोठी आग लागली. ही आग संपूर्ण मजल्यावर वेगाने पसरली. जे लोक जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना पोलिसी बळावर रोखले जात होते कारण, लॉकडाऊन असल्याने कोणालाच घराबाहेर पडता येत नाही. या आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून व घुसमटून दहा लोकांचा मृत्यू झाला. या आगीची घटना सोशल मीडियावरून संपूर्ण देशात व्हायरल झाली. आगीच्या ज्वाळांनी वेढले असतानाही घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली, असे संदेश सर्वत्र पोहोचले. सक्तीचा लॉकडाऊन आता सहन करणे शक्य नाही, अशी भावना बळावल्यामुळेच लोक रस्त्यावर उतरले आणि शी जिंगपिंग यांचा राजीनामा मागू लागले. उद्या आमच्या घरात आग लागली, तर आम्हालाही बाहेर पडू दिले जाणार नाही आणि आम्हीही आगीत होरपळून मरू, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली. या आगीच्या घटनेनंतर शांघायसह चीनमधील तेरा प्रमुख शहरांत लोकांमधील असंतोष उफाळून आला.
चीनमध्ये लोकशाही नाही. हुकूमशाही राजवट आहे. सरकारच्या विरोधात तिथे काहीच करता येत नाही आणि कोणी केलाच, तर त्याचे काय होते, हे नंतर कुणाला कळत नाही. भारताप्रमाणे तिथे काळे झेंडे दाखविण्याची कोणी हिंमत करीत नाही. पण लॉकडाऊनच्या विरोधात लोकांनी हातात ब्लँक व्हाइट पेपर (कोरे कागद) सरकारचा निषेध करण्यासाठी फडकवले. झिरो कोविड पॉलिसीच्या विरोधात निदर्शने करणारा जमाव व पोलीस यांच्यात ग्वांगझू शहरात चांगलीच जुंपली असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. जमावाकडून पोलिसांवर काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्याचे त्यात स्पष्ट दिसत होते. चीनमध्ये लोक पोलिसांवर दगड भिरकावत आहेत व पीपीई किट परिधान केलेले पोलीस स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. पोलिसांनी काही लोकांना पकडून हातकड्या घालून नेतानाचे व पोलीस गाड्यांमध्ये लोकांना जबरदस्तीने बसवले जात असल्याचे क्लिपिंग्ज बघायला मिळत आहेत. अनेक घराघरांत घुसून पोलीस झडत्या घेत आहेत. शहरांमध्ये लोकांचे जमाव रस्त्यावर येऊ नयेत म्हणून मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा या वर्षी पुन्हा उद्रेक झाल्यापासून चीन सरकारने देशभर कठोर निर्बंध जारी केले. कडक लॉकडाऊन हा त्यातलाच एक भाग आहे. लॉकडाऊन काळात लोक घराबाहेर पडू शकत नाहीत व त्याचा परिणाम प्रशासनातील अधिकारी मनमानी वागत आहेत. लोकांचा प्रक्षोभ बघून सरकारने काही निर्बंध शिथिल केलेत. पण प्रत्यक्षात अधिकारी व नोकरशहा जनतेला कोणतीच सूट किंवा सवलत देत नाहीत, त्याचा लोकांमध्ये संताप आहे.
जिनपिंग सत्तेवरून खाली उतरा, कम्युनिस्ट पार्टी सत्ता सोडा, चीन अनलॉक करा, अशा घोषणा लोक देत आहेत. निदर्शकांची पोलीस पिटाई तर करतातच, पण त्यांच्यावर तिखट मिरचीचे फवारे मारतात. बीजिंगमधील एका विद्यापीठाच्या भिंतीवर नो टू लॉकडाऊन, येस टू फ्रीडम, नो टू कोविड टेस्ट, येस टू फूड अशा घोषणा रंगवलेल्या दिसतात. विद्यार्थी, मजूर, कामगार, आम नागरिक लॉकडाऊनला जाम कंटाळले आहेत. जेक मा हे अलिबाबा समूहाशी संबंधित ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन केले, त्यानंतर ते गायबच झाले. कम्युनिस्ट पक्षाचे नेते रेन झिकियांग यांनी १२ मार्च २०२० रोजी जिनपिंग यांच्या कोविड धोरणावर टीका केली, त्यानंतर ते काही महिने गायब होते. नंतर सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले गेले. एक दिवस सुनावणी झाली व त्यांना अठरा वर्षे जेलची शिक्षा झाली. चीनमध्ये असे भीतीचे वातावरण असताना, देशात सरकारच्या धोरणाच्या विरोधात लोक रस्त्यावर येऊन प्रदर्शन करतात, हे आश्चर्यकारक आहे.
जगात कोरोना संपुष्टात येत आहे. पण चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे, हे कसे काय? लॉकडाऊनच्या विरोधात लोकांमध्ये जो असंतोष खदखदत होता, तो एका इमारतीत लागलेल्या आगीचे निमित्त होऊन रस्त्यावर प्रकट झाला. शांघाय, शिंजियांग, वुहान अशा मोठ्या प्रांतात व तेरा शहरांत दीर्घ काळ लादलेल्या लॉकडाऊनमुळे कामकाज व अर्थव्यवहार दीर्घ काळ ठप्प झाले. लोकांचा आवाजच उमटत नसल्याने त्यांचे दु:ख बाहेर येत नव्हते. लॉकडाऊनमुळे व काम ठप्प असल्याने लोकांचे दैनंदिन व मासिक उत्पन्नही घटले. खाण्या-पिण्याचा खर्च कमी करूनही ताळमेळ बसेना, अशी अवस्था लोकांची झाली. लोकांच्या मोबाइल फोनची पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे म्हणून लोक त्रस्त आहेत.
एका वृत्तानुसार चीनमध्ये ट्वीटर, फेसबुक, गुगलचा वापर करण्यास बंदी आहे. पोलिसांच्या भीतीने लोक आपले सोशल मीडियावरील चॅटिंग डिलीट करीत आहेत. सरकारविरोधातील असंतोष व लॉकडाऊनला होणारा विरोध याविषयी बातम्या चीनमधील मीडिया देत नाही. झीरो कोविड पॉलिसीच्या विरोधात पाश्चिमात्य मीडिया अतिशयोक्त बातम्या पसरवत आहे, असे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. – स्टेटलाइन, डॉ. सुकृत खांडेकर