शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. त्यासाठी समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण गेले पाहिजे. त्याकाळी तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये, समाजाच्या चुकीच्या विचारसरणीमुळे बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते. बाबासाहेबांचे (Babasaheb Ambedkar) वडील सैन्यात असल्याने विशेष शाळेत त्यांना प्राथमिक शिक्षण मिळाले. विद्यार्थीदशेपासून बाबासाहेबांनी जातिभेद, अपमानाकडे दुर्लक्ष करीत आपले शिक्षण चालू ठेवले. मॅट्रिकच्या शिक्षणानंतर बडोद्याच्या सयाजी गायकवाड यांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून, शिष्यवृत्तीवर शिकायला परदेशात पाठविले.
बाबासाहेब चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे यश साजरे करताना दादासाहेब केळुसकरांनी ‘बुद्धाचे चरित्र’ हे पुस्तक भेट दिले होते. नकळत त्याच पुस्तकांनी त्यांना साद घातली. गुरू गौतम बुद्धांची शिकवण आणि महात्मा फुलेंच्या कार्याचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. संत कबीर आणि शाहू महाराजांना बाबासाहेब गुरू मानीत.
लंडनमध्ये घडलेली छोटी घटना – बाबासाहेब, लंचब्रेकमध्ये ग्रंथालयात बसून ब्रेड खाताना ग्रंथपाल यहुदीने त्यांना पकडले. दंड आकारला, त्यांची सदस्यता रद्द करणाऱ्यांची धमकी दिली. बाबासाहेबांनी प्रथम माफी मागत नम्रपणे मी येथे कोणत्या कारणासाठी आलो ते खरे सांगितले. कॅफेमध्ये खाण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसाही नाही. त्यांचे प्रामाणिक उत्तर ऐकल्यावर ग्रंथपाल यहुदी म्हणाले, आजपासून मी माझे जेवण तुमच्याबरोबर वाटून खाणार.
परदेशात शिकत असताना, नवा देश, नवी संस्कृती, नवे ज्ञान अनुभवले. माणसा-माणसांतील संबंधातील जाण आली. भेदभावाची कृत्रिम बंधनं नसलेला मुक्त समाज पहिला. शिक्षणाबरोबर बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्वही विकसित झाले. त्यांनी ओळखले, समाजातील परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही.
बॅरिस्टर होऊन डॉ. बाबासाहेब भारतात आल्यावर आपल्या बांधवांचे, दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले; नव्हे त्यासाठीच भारतात आले. गुलामगिरीच्या बेड्या तोडून प्रथम त्यांना ताठ मानेने, स्वाभिमानाने जगायला शिकविले. निर्भय केले. शोषित वर्गाचे शिक्षण झालेच पाहिजे, हा बाबासाहेबांचा आग्रह. त्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांच्या वसतिगृहाची, रात्रीच्या शाळेची सोय करून, शिक्षणाची प्रेरणा दिली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश सगळ्यांना दिला. त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, कालांतराने सिद्धार्थ, मिलिंद या मुंबई, औरंगाबाद येथे शिक्षण
संस्था काढल्या.
त्या आधी दलित बांधवांच्या व्यथा मांडण्यासाठी शाहू महाराजांच्या मदतीने ‘मूकनायक’, बहिष्कृत ही पाक्षिके; समाजाच्या, दलितांच्या विकासासाठी विविध वृत्तपत्रे, नियतकालिके चालवली. तरुणांसाठी क्रीडा मंडळे, विधायक संस्था, परिषदा, सभा-मेळाव्यांतून शिक्षणाचे महत्त्व सांगत होते.
‘बहिष्कृत हितकारिणी’ या संस्थेपासून डॉ. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक आयुष्याला सुरुवात केली. ‘शिकवा, चेतवा आणि संघटित करा’ या ‘हितकारिणी’ संस्थेच्या ब्रीद वाक्यांत शिक्षणाला अग्रक्रम होता. दादासाहेब गायकवाडांना पत्रात लिहितात, ‘आपण इंग्रजीचा अभ्यास चालू ठेवायला हवा. इंग्रजीचे अज्ञान सार्वजनिक कामात पदोपदी नडेल, तरी इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका.’ यावरून शिक्षणविषयक त्यांचा प्रगल्भ दृष्टिकोन दिसून येतो. महात्मा फुल्यांचा, सामाजिक, शैक्षणिक विषमता निर्मूलनाचा वारसा आंबेडकरांनी समर्थपणे पुढे नेला.
विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षणसंस्थेचे निर्माते असा शिक्षणक्षेत्रात बाबासाहेबांचा चढता आलेख आहे. ते म्हणतात, ‘प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे.’ म्हणून १४ वर्षांपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे.
डॉ. बाबासाहेबांचे ज्ञान, वाचन, व्यासंग, लेखन, चिंतन आणि वक्तृत्व असे चौफेर व्यक्तिमत्त्व. त्यांचा स्वतःचा मोठा ग्रंथसंग्रह होता. स्वतः ते अठरा-अठरा तास अभ्यास करीत. शिक्षणासाठी जगभ्रमंती करून, आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून, अनेक विषयांत प्रभुत्व, अनेक पदव्या, अनेक भाषा प्राप्त केल्या होत्या. म्हणूनच डॉ. बाबासाहेबांचा पुतळा किंवा चित्र पुस्तकांशिवाय पूर्ण झालेले दिसत नाही.
डॉ. बाबासाहेबांची विद्वत्ता, शैक्षणिक योग्यता, प्रतिभा व्यापक आणि भव्य होती. म्हणून त्यांना “जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती’ तसेच “सिम्बॉल ऑफ नॉलेज” म्हणून ओळखले जाते.
बाबासाहेबांचे विद्यार्थ्यांशी अतूट संबंध होते. ‘विद्यार्थ्यांनो जागृत राहा’ या लेखात त्यांनी त्यांचे शिक्षण काळातील क्षणाक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. ते सांगतात, “काय शिकावं, हे विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे. स्वतःची लायकी विद्यार्थीदशेतच वाढवा.” ज्ञान प्राप्त करण्याच्या संदर्भात म्हणतात, “विद्यार्थ्यांनो तुम्ही नुसते शिक्षण घेऊ नका, जे शिक्षण घ्याल, त्यात स्वतःला सिद्ध करा.”
पुणे येथील एका संमेलनात डॉ. आंबेडकर म्हणाले, “मी आजन्म विद्यार्थी आहे.” अति उच्च दर्जाची विद्वत्ता, ज्ञान असतानाही स्वतःला आजन्म विद्यार्थी मानणं आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले, म्हणून शासनाने राज्यांत त्यांचा शाळा प्रवेशाचा दिवस (७ नोव्हेंबर) हा विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो.
१. राष्ट्रहित आणि समाजहिताचे भान ठेवते ते खरे शिक्षण.
२. शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुला-मुलींना शिकू द्या. बालपणीच लग्न करू नका. शिक्षणामुळे आचार-विचारात बदल होतो.
३. मुला-मुलींच्या मनातील न्यूनगंड दूर करून त्यांना परंपरागत कामात न गुंतवता महत्त्वाकांक्षी बनवा.
४. विद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजवावेत यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.
५. विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन अज्ञान व खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत.
६. मी प्रवास करताना मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमानपत्र असतात.
७. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
८. देशाच्या विकासासाठी, बाबासाहेबांना त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा, विज्ञानवादी असायला पाहिजे.
९. आपण राजकीय चळवळीला जेवढे महत्त्व देतो, तितके शिक्षण प्रसाराला देत नाही.
१०. डॉ. आंबेडकरांच्या मते व्यक्तीला; अस्तित्वाची, क्षमतेची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण! निर्भय व्हा आणि जगाचे राज्य मिळवा.
शिक्षणप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘लोकशिक्षण’ या नात्याने अनेक शैक्षणिक कार्य केले. ते सांगतात, “विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, शिक्षणाअभावी माणूस सर्वस्व गमावतो. सर्व मानव जन्मजात समान असून प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यासाठी सर्वांनी शिकले पाहिजे.”
६ डिसेंबर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन! – मृणालिनी कुलकर्णी
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…