Thursday, September 18, 2025

Nagnath Kottapalle : ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (Nagnath Kottapalle) यांचे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. 'राजधानी', 'वारसा', 'सावित्रीचा निर्णय' या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. 'गांधारीचे डोळे', 'मध्यरात्र', 'पराभव' या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत.

महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा 'ज्योतीपर्व' हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. साहित्यसेवा करतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

डॉ. कोत्तापल्ले तसे मराठवाड्यातले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षणही मराठवाड्यातच पूर्ण झाले. मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९३च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेताना त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरी केली. साहित्य परिषदेच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींची त्यांना जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी 'कमवा व शिका' ही योजना बळकट करताना विद्यार्थ्यांचे मानधन वाढवले. त्यांच्या निर्णयाचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला.

कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपीमुक्ती स्वीकारली. विद्याथीर् संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यात डॉ. कोत्तापल्ले यांना यश आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा