
ज्योती जाधव
कर्जत : कित्येकदा भाजीपाल्याची आवक वाढली की दर कमी होतात. मात्र वाशी या मार्केटमधून कमी दरात कर्जतमध्ये (Raigad) भाज्या येत असतानाही दुपट्टीने किलोचे दर घेऊन ग्राहकांना लुटले जात आहे. अशा प्रकारे विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याने कर्जतवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांची अवस्था काय घेऊ... अन्... काय खाऊ, अशी झाली आहे.
वाशीतील घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. बहुतांश भाज्या २० ते २५ रु. किलोच्या घरात आल्या असून काही भाज्यांचे दर १० रु. किलोंच्या घरात आले आहेत. एवढे दर कमी होऊनही कर्जतच्या मार्केटमध्ये किलोप्रमाणे २५ ते ३० पेक्षा दुप्पट दराने विक्रेता भाजी विकत आहे. त्याचप्रमाणे यंदा अवेळी आलेल्या पावसाने भाजीची स्थिती काही ठिकाणी चांगली आहे.
भाजीची आवक वाढल्याने भाव कमी झालेले आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने भाव स्थिरावलेले आहेत. पावसाळी वातावरण असून, काही भागांत पावसाने हजेरी लावलेली आहे. त्याचा भाजीच्या पिकांना फायदा झाला आहे. त्यामुळे टोमॅटो, वांगे आदी पिकं चांगली आली आहेत. तसेच उन्हाळी भाज्यांची आवकही वाढली आहे.
मात्र कमी दर झाले असताना कर्जतमध्ये कुठेच कमी दराने विक्रेता भाज्या विकताना दिसून येत नाही. वाशीमध्ये मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर हे कमी दरात मिळत असताना, कर्जतमधील विक्रेता मेथी, शेपू, पालक, कोथिंबीरचे दोन दोन भाग करुन २० ते २५ रू. पर्यंत एक भाग विकतो. हिरव्या मिरच्या, टोमॅटो, काकडी, बीट, गाजर आणि मटार दुप्पट भावाने विकले जात आहेत.
याबाबत विक्रेत्यांना विचारले असतात, तर आम्हाला भाजी आणणे परवडत नाही. आवक वाढल्याने मार्केटमध्ये जरी दर कमी झाले असले तरी आम्हाला कमी दरात भाजीपाला विकणे परवडत नाही. गाड्यांचा खर्च द्यावा लागतो असे सांगितले जाते.
मध्यमांमध्ये भाजीपाल्यांचे दर कमी झाले असल्याचे दाखविले जाते, मात्र कर्जतमध्ये रोजचा बाजार असो अथवा आठवड्याचा भाजार असो भाजी आहे त्या दरात म्हणजे महागाईच्या दरात घ्यावी लागते. भाजीचे दर कमी होऊनही स्थानिक भाजी विक्रेत्यावर काही फरक होत नाही. तो त्याच्या दराप्रमाणे भाज्यांची विक्री करतो. - रेश्मा देशमुख (ग्राहक)
वाशी मार्केटमधील किलोप्रमाणे दर
कोबी ६ रु., फ्लॉवर ८ रु., भोपळा १० रु., काकडी ८ रु., पडवळ १२ रु., सुरण १० रु., टोमॅटो १५ रु., वांगी १५ रु., कारली २२ रु., घेवडा २५ रु., भेंडी २० रु., ढोबळी मिरची २५ रु., फरसबी २० रु. हिरवा वाटाणा १८ ते २२ रु. किलो झाला आहे, अशी माहिती बाजार समितीने दिली आहे.