
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचे (compares) प्रकरण ताजे असतानाच आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे.
"औरंगजेबाने शिवरायांना रोखले, पण छत्रपती शिवाजीराजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. शिंदेनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले पण शिंदेही महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले", असे मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला असून लोढा यांनी सेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केल्याने या प्रकरणावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
आज ३६३ वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
या वाचाळवीरांना आवरा - अजित पवार
या वाचाळवीरांना आवरा, असे म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला आहे. एकाला ठेच लागल्यानंतर दुसरा शहाणा होतो, पण यांच्यामध्ये स्पर्धाच लागल्याचे ते म्हणाले. महाराजांची तुलना कधी होऊ शकते का? अशीही विचारणा त्यांनी केली.
वेगळा अर्थ काढू नये - उदय सामंत
मंगल प्रभात लोढांनी जे उदाहरण दिले त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. शिंदे हे दबावाखाली होते, कडेकोट बंदोबस्तात होते. त्यातून सुटका त्यांनी केली. म्हणजेच ज्या पद्धतीने मुघलांच्या ताब्यातून महाराजांनी सुटका केली, त्याच पद्धतीने शिंदेंनी सुटका केली. त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोढा यांच्या वक्तव्यावर दिली.