
रत्नागिरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणावरील वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धांदल सुरू आहे. मात्र, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सद्यस्थितीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये उमेदवार गुंतले आहेत, त्यामुळे शेवटचे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासह २४९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. निवडणुका होत असलेल्या ३१ ग्रामपंचायतींमध्ये नाटे, साखरीनाटे, पाचल या अकरा सदस्यीय, तर मिठगवाणे, नाणार, तळवडे, साखर, कळसवली, कोतापूर, ओझर, जुवाठी, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली या नऊ सदस्यीय, तर उर्वरित अठरा ग्रामपंचायती सात सदस्यीय आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, २ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वर्चस्व ताकद दाखवित प्रस्थापित करण्याची संधी गावपुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासह उमेदवारी निवडीमध्ये राजकीय पक्ष नेतृत्वासह गावपुढारी गुंतल्याचे चित्र गावागावांमध्ये दिसत आहे.
राजापुरातील ‘या’ ग्रामपंचायतींसाठी होणार आहे निवडणुका
मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटुळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विल्ये, हसोळतर्फे सौंदळ आणि धाऊलवल्ली़ एकूण ग्रामपंचायती : ३१; एकूण प्रभाग : ९६; एकूण सदस्य संख्या : २४९.