दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) मंगळवारी रात्री उशीरा ब गटातील सामन्यात अमेरिकेने इराणला १-० असे पराभूत केले. या सामन्यातील पराभवामुळे इराणचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
इराणचा संघ ग्रुप स्टेजमधील ३ पैकी २ सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात इराणचा इंग्लंडकडून ६-२ असा पराभव झाला होता. यानंतर इराणच्या संघाने वेल्सचा २-० असा पराभव करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात १-० अशा पराभवानंतर बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
इराणमध्ये जल्लोष
पराभवानंतर इराणमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे. इराणच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचा फुटबॉल संघ तेथील सरकारचे प्रतिनिधित्व करतो, सामान्य लोकांचे नाही.
तेहरानसह इराणमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून अमेरिकेविरुद्धच्या पराभवाचा आनंद साजरा केला. इराणमध्ये निषेधांच्या ताज्या घडोमोडींमध्ये महिला सक्रियपणे सहभागी होत आहेत. ते स्वतःसाठी अधिक हक्क आणि मोकळेपणाची मागणी करत आहेत.
इराण सरकार हे निदर्शन दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला इराण फुटबॉल संघाचे खेळाडूही देशात सुरू असलेल्या निदर्शनांच्या घटनांशी सहमत असल्याचे सांगण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले नाही.