Thursday, May 8, 2025

महत्वाची बातमीरायगड

Revdanda : आगरकोट किल्ला मोजतोय शेवटची घटका

Revdanda : आगरकोट किल्ला मोजतोय शेवटची घटका

सुभाष म्हात्रे


अलिबाग : तालुक्यातील चौल-चंपावती या प्राचीन नगरीचे पोर्तुगीज अंमलामध्ये दोन भाग पडून रेवदंडा (Revdanda) विभागाला लोअर चौल व चौल विभागाला अप्पर चौल संबोधले जाऊन रेवदंडा व चौल ही दोन गावे निर्माण झाली.


१५२४ मध्ये पोर्तुगिजांनी रेवदंड्यातील आगरकोट किल्ला बांधून पूर्ण केल्यानंतर सुमारे २०० वर्षांपेक्षा जास्त काळ म्हणजेच मराठ्यांनी १७४० मध्ये हा प्रदेश ताब्यात घेईपर्यंत तो पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. कालावधीत या किल्ल्यात बांधलेल्या अनेक इमारती, बुरूज, तटबंदी, चर्च, दरवाजे, तुरूंग, पागा आदींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने हा किल्ला आता शेवटची घटका मोजतो आहे.


रेवदंडा गावाच्या दक्षिण टोकास या किल्ल्याचा दक्षिण दरवाजा आहे. तेथपासून अलिबाग रस्त्यावर किल्ल्याचा तट फोडून तयार केलेल्या मार्गापर्यंत हा किल्ला विस्तारलेला आहे. रेवदंडा-अलिबाग रस्त्याच्या थोडे पुढे पश्चिमेला किल्ल्याचा उत्तर दरवाजा आहे. या दोन दरवाज्यामध्ये असणाऱ्या किल्ल्याचे अनेक अवशेष आजही पाहावयास मिळतात. सोळाव्या शतकात १५२४ मध्ये हा किल्ला बांधल्यानंतर सोळाव्या शतकाच्या अखेर पूर्वकाळात येथे अनेक इमारती बांधल्या गेल्या. या किल्ल्यात घडीव दगडांच्या भिंती असलेल्या आवाराच्या आत सेनाधिकारी राहात होता. तेथे एक तुरुंगही होते.


किल्ल्यात २०० पोर्तुगिज व ५० स्थानिक ख्रिश्चनांची घरेही होती. तसेच दोन शस्त्रागरे होती. त्याचप्रमाणे किल्ल्यात भव्य कॅथेड्रक रूग्णालय, सेंट पॉल जेझुईट चर्च, जेझुइट मोनॅसटी, डोमिनिकन फ्रॉन्सिस्कन चर्च, सातखणी बुरूज आदी बांधण्यात आले होते. यामध्ये सातखणी बुरूज डोमिनिकन फ्रॉन्सिस्कन चर्चचा भाग समजला जातो. ऑगस्टिनियन चर्च व मॉनेस्टटी अशा सात इमारती होत्या. पोर्तुगिज काळात या भागाचे वैभव खूप मोठे होते. काळाच्या ओघात या सर्वच वास्तू नष्ट झाल्या. त्याचप्रमाणे भिंतीच्या बाहेर सेंट सॅबेस्टीयन चर्च, सेंट जॉन पॅरिस चर्च व मदर ऑफ गॉडचे कॅपूचिन चर्च अशा तीन इमारती होत्या. त्यापैकी मदर ऑफ गॉडचे मंदिर रेवदंडा गोळा स्टॉपवरून भोईवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर अस्तित्वात आहे. त्याला मांजरूबाईचे मंदिर, असेही म्हटले जाते. मांजरदेस असंही उल्लेख इतिहासात आढळतो.


सन १६३४ नंतर तटबंदीची बरीच दुरूस्ती केली गेली. सन १६३५ मध्ये उत्तर दरवाजा, तर १६३८ मध्ये दक्षिण दरवाजा दुरुस्त झाला. १६५६ मध्ये दक्षिण दरवाजासमोरचे बांधकाम केले गेले. १६८८ मध्ये वायव्येचा टॉवर बांधला गेला. सरासरी ६.०९ मीटर उंच व ३.६६ मीटर रुंद असलेल्या गोलाकार भिंतीच्या लांबी अंदाजे २.४२ कि.मी. होती. या भिंतीवर बंदुकीने मारा करण्यासाठी लहान झरोके असलेली १.८३ मीटर उंचीची दुसरी भिंत होती. तसेच अर्धवर्तुळाकार नऊ मनोरे होते. दक्षिण दरवाज्याच्या दोन्ही कमानीतून आत गेल्यावर थोडे पूर्वेला चौकोनी बुरूज आहे. येथेच पोर्तुगिजांनी १५१६ सालात वखार बांधली होती.


सभोवताली सुरक्षिततेसाठी १५२१-१५२४ या कालावधीत मजबुत भिंती बांधल्या. वखारीचा दर्शनी भाग दगडी दरवाजाची एक सुंदर कमान असून, ती शाबूत आहे. दरवाज्याचा आत पूर्व-पश्चिम सुमारे ४० पावले व दक्षिणोत्तर ५६ पावले जागेभोवती पूर्वी ७.६२ मीटर उंचीची भिंत होती. नैॠत्येस १५.२४ मीटर उंचीचा भक्कम बुरूज होता. सध्या त्याच्या भिंती पडलेल्या असून, बुरूज मात्र अस्तित्व दाखवित आहे. या जागेत कप्तानाचे निवासस्थान व तुरूंग होता. येथे आता नारळ पोफळीची बाग असून, उत्तरेच्या मुख्य दरवाज्यापासून ५४.८६ मीटर दक्षिणेस व अलिबाग रस्त्याच्या पश्चिमेस जेझूइट मोनस्टॅरीच्या भिंतीचे काही अवशेष पाहायला मिळतात.


आगरकोट किल्ल्याची दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेली आहेत. सातखणी बुरुजाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडे पाठविलेला असून, निधी उपलब्ध होताच तेही काम हाती घेण्यात येणार आहे. - श्री. एलीकर (अधिकारी, पुरातत्त्व विभाग)

Comments
Add Comment