
दोहा (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup) स्पर्धेत मंगळवारी पोर्तुगालने उरुग्वेवर २-० असा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालच्या विजयात स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि स्ट्रायकर ब्रुनो फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक गोल करीत चमकदार कामगिरी केली. गटातील सलग दोन सामने जिंकत पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी फ्रान्स, ब्राझील यांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पोर्तुगालने उरुग्वेवर दोन गोल केले. पोर्तुगालचा दुसरा गोल पेनल्टी स्ट्रोकच्या स्वरुपात अगदी शेवटच्या क्षणी झाला. उरुग्वेच्या डीमध्ये ब्रुनोला रोखण्याचा प्रयत्न रोचेटने केला. त्यावेळी ब्रुनोचा तोल गेला. अवैधरित्या रोखल्याचा आक्षेप पोर्तुगालने केल्यानंतर व्हीडिओद्वारे रेफ्रींनी पेनल्टी स्ट्रोक दिला आणि ब्रुनोने सहज चकवा देत गोल करीत विजय साकारला.
पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या हाफची सुरूवात मात्र धमाकेदार झाली. दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी कडवे प्रयत्न सुरू झाले. त्यात रोनाल्डोने सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला बाजी मारली. डीच्या मध्यभागी पोर्तुगालच्या ब्रुनो फर्नांडिसने उंचावरून अतिशय छान पास दिला आणि त्या क्षणी मागून धावत आलेल्या रोनाल्डोने हेडरद्वारे चेंडू गोल जाळ्यात धाडला. रोनाल्डोचा हा विश्वकरंडक स्पर्धेतील नववा गोल होता. उरुग्वेने ७२ व्या मिनिटाला अनुभवी लुईस सुआरेझला मैदानात आणले. यामुळे उरुग्वेच्या आक्रमणाची धार वाढली होती. पण शेवटपर्यंत त्यांना गोल करणे शक्य झाले नाही.