Thursday, September 18, 2025

BCCI : टीम इंडियाचा सिलेक्टर बनण्यास विनोद कांबळी उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुख पदासाठी अर्ज करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यात मुंबईच्या खेळाडूंची देखील नावे आहेत. (BCCI) मुंबईच्या वरिष्ठ संघ निवड समितीचे विद्यमान प्रमुख सलील अंकोला, माजी यष्टिरक्षक समीर दिघे आणि माजी खेळाडू विनोद कांबळी यांनी मुंबईतून अर्ज केला आहे.

नव्या निवड समितीसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ५० हून अधिक लोकांनी अर्ज केल्याचे समजते. विनोद कांबळी टीम इंडियाचा सिलेक्टर बनण्यास उत्सुक आहे.

माजी डावखुरा फिरकीपटू मनिंदर सिंग, माजी सलामीवीर फलंदाज शिव सुंदर दास यांनी भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीच्या पदासाठी अर्ज केले आहेत. माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही. अजित आगरकर यांनी अर्ज केल्यास त्यांची निवड समितीचे अध्यक्षपद निश्चित असल्याचे मानले जात आहे.

टीम इंडियाच्या निवड समितीचा मुख्य निवडकर्ता होण्यासाठी उमेदवाराला किमान ७ किंवा अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असावा. उमेदवाराला ३० प्रथम श्रेणी सामने, १० एकदिवसीय सामने किंवा २० लिस्ट-ए सामन्यांचा अनुभव असावा. मुख्य निवडकर्ता पदासाठीच्या उमेदवाराने क्रिकेटमधून निवृत्तीची ५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

Comments
Add Comment