Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरTuberculosis Survey : वसई-विरारची हवा बाधक! शहरात क्षयाचे ३ हजार ४६४ रुग्ण

Tuberculosis Survey : वसई-विरारची हवा बाधक! शहरात क्षयाचे ३ हजार ४६४ रुग्ण

संजय राणे

विरार : मागील काही वर्षांपासून वाढते प्रदूषण व क्षेपणभूमीतून निघणारी दुर्गंधी आणि धुरामुळे वसई-विरार शहराची हवा बाधित झाली आहे. (Tuberculosis Survey) त्यामुळे शहरात श्वसनाशी निगडित आजारांचे रुग्ण वाढत आहेत. जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत केलेल्या क्षयरोग दुरीकरण सर्वेक्षणादरम्यान शहरात क्षयाचे ३ हजार ४६४ रुग्ण आढळले आहेत.

या सर्वेक्षणात वालीव विभागात २९७, विरारमध्ये ९३१, धानीव ४९३, आंबेडकर नगर ८७८ आणि आचोळे विभागात ८६५ इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याचे वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तर जूचंद्र ८१, नवघर ६७, पेल्हार १८७, सातिवली १३०, वालीव १३२ व परिसरातील खासगी क्षेत्रात ५२ अशी एकूण मिळून ग्रामीण परिसरात ४४९ इतकी क्षयरुग्णांची आकडेवारी शहर क्षयरोग अधिकाऱ्यांनी सादर केली आहे.

मागील काही वर्षांत वसई-विरार शहरात बांधकामांचा वेग वाढलेला आहे. बांधकामे करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याने हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढलेले आहे. शहरात तासनतास होणारी वाहतूक कोंडीही हवा बाधित करत आहे. याशिवाय गोखिवरे येथील क्षेपणभूमीतून निघणारी दुर्गंधी व धूर यामुळे हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स या संकेतस्थळावरील संदर्भानुसार, वसईत हवेतील धूलिकण आणि इतर घातक पदार्थांचे प्रमाणही वाढलेले आहे. परिणामी शहरात खसा खवखवणे, उच्च रक्तदाब आणि श्वसनाशी निगडित रुग्ण वाढले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केलेल्या पाहणीत जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वसई-विरार शहरात क्षयरुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे निदर्शनास आलेले आहे. शहराची लोकसंख्या आज २५ लाख इतकी आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील गोखिवरे सर्व्हे क्रमांक ३०(अ) ३१, ३२ या भूखंडावर वसई-विरार शहर महानगरपालिकेचे विस्तृत असे डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडवर शहरातून दैनंदिन निघणारा ८५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जात आहे. केंद्र सरकारच्या सॅटेलाईट सिटी योजनेंतर्गत पालिकेला सुका कचरा व ओला कचरा संकलित करण्याचे निर्देश होते. मात्र पालिकेने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत जनजागृती करणे आवश्यक होते; तीही केलेली नाही. ओला व सुका कचरा याबाबत पालिकेचे कोणतेही नियोजन नाही. याचे परिणाम म्हणून आज शहरात कचरा समस्या गंभीर बनली असून; त्यातून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.

Lavani artiste : लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन : तीन जण जखमी

क्षेपणभूमीवर १५ लाख मेट्रिक टनहून अधिक कचरा संकलित झालेला आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. या संदर्भात हरित लवादानेही पालिकेला प्रतिदिन साडेदहा लाख रुपये इतका दंड ठोठावलेला आहे. या दंडाची रक्कम आता ११५ कोटी इतकी झालेली आहे. कचरा संकलन आणि प्रक्रिया कामी पालिका महिना १४ कोटी रुपयांचा खर्च करत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन यापुढे महापालिका स्वतः करणार आहे. यासाठी महापालिकेने १० ट्रॉमिल, पाच पोकलेन (ब्रेकर), दोन लॉन्ग बूम, दोन शॉर्ट बूम, ५० ट्रिपर आणि १० कॉम्पॅक्टर अशी भली मोठी यंत्रसामग्रीची ऑर्डर केलेली आहे. तर यापूर्वी पालिकेने २३ ॲम्ब्युलन्स, (छोट्या) चार ॲम्ब्युलन्स मोठ्या, २२ पिकअप बोलोरो गाड्या खरेदी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या खर्चानंतरही वसई-विरार महापालिका कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यात कमी पडले असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -